गवळी गँगने धमकाविलेल्या व्यापार्याचे वाघोली कनेक्शन
वाघोली : व्यापार्याला धमकविल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कुख्यात डॉन अरुण गवळी गँगच्या तिघांना अटक केली असल्याने पुणे जिल्ह्याच्या अखिल भारतीय सेनेच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. धमकावलेल्या व्यापार्याचे वाघोली कनेक्शन असल्याने वाघोलीतील अखिल भारतीय सेनेचे पदाधिकारी पोलिसांच्या रडारवर असल्याचे खाजगीत बोलले जात आहे. त्यामुळे या पदाधिकार्यांनी आपले मोबाईल स्वीचऑफ करून ठेवले आहेत.
अभासेचे प्रमुख पदाधिकारी वाघोलीतील!
मंचर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अरुण गवळी गँगच्या तिघांना पकडल्यानंतर पुणे जिल्हा अखिल भारतीय सेनेच्या गोटामध्ये एकच खळबळ माजली. पुणे ग्रामीण पोलिसांनी अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकार्यास केलेल्या अटकेनंतर वाघोलीतील पदाधिकार्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले आहे. अखिल भारतीय सेनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, तालुका युवकअध्यक्ष वाघोलीतील आहेत. धमकाविलेल्या व्यापार्याचे कनेक्शन वाघोलीशी संबंधित असल्याने वाघोलीतील पदाधिकारी पोलिसांच्या रडारवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. सध्यातरी पदाधिकार्याचे भ्रमणध्वनी नॉट रीचेबल आहेत. तर ग्रामीण पोलिस या सर्व पदाधिकार्यांवर बारकाईने नजर ठेवून असून, त्यांची कुंडली गोळा करू लागले आहेत. त्यातील अनेकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहाता, त्यातील अनेकांना लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.