वाघोलीतील इच्छुक उमेदवार होणार हद्दपार!

0

वाघोली । लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यातील आरोपींची माहिती संकलित करून, वरिष्ठांना प्रस्ताव सादर करण्याचे काम सुरू झाले आहे. येथील आरोपींचा आकडा जवळपास 200 पेक्षा अधिक असल्याने या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे अनेक इच्छुक हद्दपार होणार आहेत. डिसेंबरमध्ये होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर शांतता आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव अशांना हद्दीपारीचे आदेश काढले जाणार आहेत असल्याचे हवेली उपविभागीय अधिकारी सुहास गरुड यांनी सांगितले.

वाघोली, लोणीकंद परिसरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढील महिन्यांत डिसेंबरमध्ये होत आहेत. याकरिता अनेक जण इच्छुक आहेत. सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने या निवडणूका चुरशीचा होणार आहेत. यामुळेच आत्तापासून अनेकांची तयारी सुरू केली आहे. यापार्श्‍वभुमीवर परिसरात शांतता व सुव्यवस्था रहावी याकरीता लोणीकंद पोलीसांनी गुन्हे नोंद असलेल्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

न्यायालयात करणार हजर
वेल्हा पोलीस ठाण्यांतर्गत ग्रामपंचायतीच्या निवडणूक काळात एका उमेदवारावर भादवि 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार संबधितास न्यायालयाने 10 दिवस पुणे जिल्हा प्रवेश बंदीची शिक्षा ठोठावली. वाघोली ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात कायदा मोडीत काढणार्‍यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असून संबंधीतांना न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याचे लोणीकंद पोलिसांनी सांगितले.

पोलिस यंत्रणा सज्ज
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कुठलाही गुन्हा नोंद असलेल्यांना निवडणूक लढविता येत नाही. यानुसार वाघोली, लोणीकंद परिसरातील अनेक इच्छुक आत्ताच निवडणुकीच्या रिंगणातूनही हद्दपार झाले आहेत. लोणीकंद पोलिस ठाणे हद्दीतील विविध गुन्ह्यांतील आरोपी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणार्‍या मंडळींना निवडणूक काळात मतदानाचा हक्ल अबाधित ठेवून हद्दपार करण्यासाठीचे काम पोलीसांनी सुरू केले आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी, हवेली उपविभागीय अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात प्रस्ताव पाठवण्यात येणार असून हवेली उपविभागीय अधिकार्‍यांच्या अंतिम आदेशाने संबधितांना हद्दपार करण्यासाठी पोलिस यंत्रणा सध्या सज्ज झाली आहे.

… तर होणार गुन्हे दाखल
राजकीय तसेच गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍या मंडळीना लोणीकंद पोलिसांनी वाघोली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या काळातही हद्दीपारीच्या नोटीसा बजावल्या होत्या. मात्र, तरीही काही राजकीय मंडळी जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार करीत होती, विशेष म्हणजे आयोगाच्या नियमानुसार प्रचारावेळी करण्यात आलेल्या व्हिडीओ शुटींगमध्येही याचे चित्रण झाले आहे. यामुळे लोणीकंद पोलिस ठाण्यातील परिसर अतिसंवेदनशील मानण्यात येत आहे. यानुसार ग्रामपंचायत निवडणूक काळात पोलिसांनी आतापासूनच कडक यंत्रणा राबविण्यास सुरूवात केली आहे. नियमांचे उल्लघन करणार्‍यांवरही गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत पोलिस आहेत.