वाघोली : एक फेब्रुवारी रोजी कचरा गाड्या वाघोली ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात येतील तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती माजी जि. प. सदस्य रामदास दाभाडे यांनी दिली.
पीएमआरडीएकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर 15 गाड्या मिळवण्यास वाघोली ग्रामपंचायतीला यश मिळाले. गाड्या मिळाल्यानंतर पासिंगसंबधी सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असताना पालकमंत्री यांची तारीख मिळत नसल्यामुळे गेली एक महिन्याभरापासून कंत्राटदार यांच्या गोडाऊनमध्ये कचरा गाड्या पडून होत्या. गाड्या अभावी कचरा संकलित करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे कचरा समस्या गंभीर होत असल्यामुळे वारंवार गाड्यांची मागणी करून देखील पीएमआरडीएकडून टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे 26 जानेवारीपर्यंत कचरा गाड्या देण्यात आल्या नाही तर पीएमआरडीए कार्यालयावर 28 जानेवारी रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांनी दिला होता. अखेर पालकमंत्री यांची तारीख मिळाली आणि कचरा गाड्यांचा मार्ग मोकळा झाला. 1 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत वाघोली ग्रामपंचायतीच्या ताब्यात गाड्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती दाभाडे यांनी दिली.