पुणे । आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादण्याऐवजी त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्याला प्रोत्साहन द्यायला हवे. आई-वडील आणि शिक्षक यांनी मुलांना लहानपणापासूनच वाचन संस्कार करायला हवेत. त्यातूनच पालकत्व अधिक प्रगल्भ होत जाते आणि मुलांना माणूस म्हणून घडविण्यात आपण यशस्वी ठरतो, असे प्रतिपादन बडोदा येथे होत असलेल्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.पालकत्वाला वाहिलेल्या आणि समाजाला समर्पित ’तुम्ही-आम्ही पालक’च्या 50 व्या विशेषांकाचे प्रकाशन मंगळवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कमिन्स सभागृहात लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पुण्याचे माजी महापौर व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश देसाई, बालमानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे, ’तुम्ही-आम्ही पालक’चे संस्थापक संपादक हरीश बुटले, संदीप बर्वे आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, मुलांना आपल्याविषयी विश्वास व आस्था वाटावी, असे संस्कार पालकांनी द्यायला हवेत. परंतू, आज कुटुंबातील विभक्तपणा आणि छोटे कुटुंबाची मानसिकता यामुळे मुलांमध्ये एकलकोंडेपणा येतो. त्यातून अनेकदा नैराश्यही येते. अशावेळी पुस्तके मुलांचे चांगले सोबती आणि मार्गदर्शक ठरतात. मुलांच्या नजरेतून पालकत्व पाहायला हवे व ते डोळसपणे स्वीकारायला हवे. पालकत्व एक कौशल्य असून, ते अधिक फुलविण्यासाठी आपण त्यांच्या निर्णयाला प्रोत्साहित केले पाहिजे. ’तुम्ही-आम्ही पालक’ हा अंक विद्यार्थी-पालक आणि शिक्षक यांच्यातील वीण घट्ट करण्याचे काम करीत आहे.
जडणघडणी-मागील इतिहास
पालकत्व’ या विषयावरील निमंत्रित कवींचे संमेलन झाले. यामध्ये अवधूत बागल, नितीन जाधव, विक्रम शिंदे, भारत सोळंकी यांनी सहभाग घेतला. हरीश बुटले यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी अंकाच्या जडणघडणीमागील इतिहास, आलेले अनुभव विशद केले. समाजाला समर्पित केलेला आणि जाहिरात विरहित असलेला हा अंक अनेक पुस्तकांचा स्रोत बनेल, असे सांगितले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.