वाटणीच्या वादातून भावावर कुर्‍हाडीने हल्ला

0

अमळनेर- वाटणीच्या वादातून एकाने सख्या भावावर कुर्‍हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना जानवे येथे घडली होती. यासंदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र गंजीधर पाटील (वय 43) हे जखमी असून बारकू गंजीधर पाटील (वय 40) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील फियादी रवींद्र पाटील हे 1 एप्रिल रोजी आपल्या रणाईचे शिवारातील शेतात दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेतातील लिंबाच्या फांद्या छाटत होते. त्यावेळी खाली बकर्‍या चरत होत्या. या बकर्‍या शेजारील बारकू पाटील या लहान भावाच्या शेतात असलेला कडबा खाण्यासाठी गेल्या. या कारणावरून बारकू पाटील हा लहान मुलांना मारत होता. याबाबत जाब विचारायला गेलेल्या रवींद्र पाटलांवर त्याने कडब्यातील कुर्‍हाड काढून डोक्यात गंभीर घाव घातला. रवींद्र पाटील यांनी जखमी अवस्थेत यांनी मोटारसायकल घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली नंतर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. त्यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संजय कंखरे हे करीत आहेत. दरम्यान, यापूर्वीच त्यांचा न्यायालयात शेतीचा वाद सुरू होता नुकताच 14 मार्च रोजी आपसात वाद मिटल्याचे समजते.