संवेदनशील अभिनेता आमीर खान यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप 2017 ही स्पर्धा सुरू केली. गावातील आणि शहरातील लोकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने दुष्काळाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.या प्रयत्नांतून आज महाराष्ट्रातील अनेक गावांत जलसंधारणाची कामे उभी राहत आहेत.सीसीटी, डीप सीसीटी, माती नाला बांध, दगड नाला बांध, शेततळी, तलाव, टायर बंधारा, ओढा खोलीकरण, रुंदीकरण, वृक्षारोपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ठिबक सिंचन, अशी कामे गावागावांमध्ये उभी राहिली. यंदा पाऊसही चांगला झाला आहे. त्यामुळे पाणी जपण्याची, पाणी अडवण्याची आणि पाणी जिरवण्याची धडपड सुरू आहे.
या धडपडीला मदत करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे तीनशेहून अधिक कार्यकर्ते उन्हाळ्यात पवार वाडीत श्रम संस्कार छावणीमध्ये सामील झाले होते. त्याबद्दल आठवण ठेवून पवार वाडीच्या गावकर्यांनी पुरस्कार वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठवले आहे. सकाळी काम केलेले लोक संध्याकाळी विसरतात. परंतु, आठवणीने कृतज्ञता व्यक्त करणारी ही ग्रामीण संस्कृती आजही जिवंत आहे, याचा अभिमानही वाटला. श्रम संस्काराची एक संस्कृती आहे. बाबा आमटे यांच्या सोमनाथ येथील प्रकल्पात दरवर्षी अनेक तरुण सामील होत असतात, तर राष्ट्र सेवा दलाचे सानेगुरुजी सेवा पथक आहे.
मुंबई, पालघर, पनवेल, सिंधुदुर्ग, नाशिक, मालेगाव, पुणे, सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर, अशा राज्यभरातील सेवा दल शाखांमधून कार्यकर्ते आणि सावित्रीच्या लेकी श्रमदानासाठी पवार वाडीत दाखल झाली होती. दोन दिवसांमध्ये या मुलांनी 2 2चे चारशेहून अधिक खड्डे खणले. इचलकरंजीच्या कार्यकर्त्यांनी सीड बँकेच्या माध्यमातून शाळाशाळांमधून गोळा केलेल्या हजारो बिया गावच्या सरपंचांकडे दिल्या. श्रमदानाबरोबर राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्र्ते गावकर्यांशी मोकळा संवाद करताना दिसत होते. यापुढे स्मार्ट व्हिलेज करण्याचा संकल्प या गावच्या राजेंद्र पवार यांनी बोलून दाखवला. जल संधारणाबरोबर या गावातील लोकांचे मनसंधारण यानिमित्ताने झाले, ही या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची आणि राष्ट्र सेवा दलासारख्या विचार देणार्या संघटनेचे यश आहे यांनी सांगितले. या पवारवाडीत इतक्या वर्षात कधीही राज्यमंत्री किंवा कॅबिनेटमंत्री आले नव्हते. परंतु, राष्ट्र सेवा दलाच्या श्रम छावणी शिबिराच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस येऊन गेले होते. पाणी फाउंडेशनच्या या स्पर्धेच्या माध्यमातून बांधावरून काही गावांत सुरू असलेले वाद 100 टक्के मिटले आहेत. जलसंधारणाबरोबर मनसंधारणेचे काम यानिमित्ताने झाले. ही चांगली गोष्ट यानिमित्ताने घडून आली. पवार वाडीतील वृद्ध, तरुण, स्त्रिया, असे 300 ते 400 लोक दररोज श्रमदानाने काम करत होते. मातीचे बंधारे, शेततळे, गरबायन बंधारा, टायरचा बंधारा, मशीनच्या साहाय्याने 5 बंधारे, सलग समतल चर, खोल समतल चर, दगडी ताली, उतारावर आडवी ताली, स्टोर बडिंग, रोप लागवड, वृक्षारोपणासाठी खड्डे आदी कामे यानिमित्ताने गावकर्यांनी बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पूर्ण केली. देशामध्ये धर्माच्या, जातीच्या नावावर जे राजकारण सुरू आहे त्याच्याविरोधात श्रमदानाबरोबरच वैचारिक श्रमदान करण्याची आज गरज अशा प्रकारच्या उपक्रमातून होत असते. पवार वाडीचा कायापालट करायचा, या ध्यासाने वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने अख्ख एक गाव सक्रिय झालं. यानिमित्ताने जागोजागी अशी माणसे सक्रिय झाली आहेत, परिवर्तनाच्या नव्या वाटेवर चालत आहेत म्हणूनच आपलीही जबाबदारी अधिक वाढते आहे.आम्ही प्रकाश बीजे रुजवत चाललो,वाटा नव्या युगाच्या रुळवत चाललो… काट्यावरून जाता, मागे न पाय घेऊ. हसर्या कळ्या फुलांची, स्वप्ने विणून घेऊ, ओसाड माळ आम्ही, फुलवत चाललो!
– शरद कदम
अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल,मुंबई
9224576702