महाराष्ट्रातील धडाकेबाज कामगिरी करून दाखवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे भारतीय जनता पक्षातील एकमेव नाव म्हणजे नितीन गडकरी. ‘आपल्या मार्गावरून पुढे पुढे चालताना समस्या तर उभ्या राहणारच. पण, त्यांच्यावर मात करण्यासाठी थेट त्यांच्यावर धडकणेच श्रेयस्कर असते’, असे ठामपणे सांगणारा नेता म्हणजे गडकरी. यशस्वी उद्योजक, राजकीय नेते ते भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि सध्याचे केंद्रीय मंत्री असा त्यांचा जीवनप्रवास आहे. इ. स. 2009 साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले.
कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. खरे तर 1995च्या निवडणुका शिवसेना-भाजपने जेव्हा जिंकल्या आणि सत्ता हस्तगत केली तेव्हाच महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकासाठी त्यांचे नाव आघाडीवर आले होते. परंतु, युतीच्या शिल्पकारांमध्ये दिवंगत प्रमोद महाजनांचा रोल अतिमहत्त्वाचा होता. त्यांचा मुख्य आधार हे दिवंगत गोपीनाथ मुंडे होते. आक्रमक आणि बहुजन चेहरा म्हणून मुंडेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि गडकरींना सार्वजनिक बांधकाम खात्यावर समाधान मानावे लागले. त्यांना दुसर्या क्रमांकावर बसावे लागले. त्यानंतर मुंडे-गडकरी हा पक्षांतर्गत संघर्ष चालत राहिला. संघ परिवाराशी एकनिष्ठ राहणारा नेता, अशीही त्यांची ओळख आहे. संघ शाखेच्या परिवारातूनच त्यांची जडणघडण झाली. ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधान परिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन 1995-1999 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान 55 उड्डाणपूल बांधले गेले. तेव्हाचा एक प्रसंग मला आठवतो. माहिम-बांद्रा येथील पुलाच्या उद्घाटनाला दिल्लीवरून महाजन आले होते. त्या भाषणात महाजन म्हणाले होते, ‘नितीनला मला केंद्रीय स्तरावर दिल्लीच्या राजकारणात घेऊन जायचे आहे. त्या भाषणात या संघर्षची स्पष्ट कुणकुण लागत होती. गडकरी म्हणजे कार्यकुशल नेता. मुंबई-पुणे या ‘एक्स्प्रेस वे’चे श्रेय त्यांच्याच पारड्यात जाते. वेळेच्या आत आणि नियोजित किमतीपेक्षा कमी खर्चात उत्तम कामगिरी कशी करावी, याचा तो आदर्श नमुना. ही कामगिरी गडकरींनी स्वतः पार पाडली. खुद्द दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही त्यांचे अनेकदा तोंडभरून कौतुक केले होते. आजही त्यांच्या कामाचा तो बाज कायम आहे. त्याबाबतीत त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. भूपृष्ठ वाहतूक व जहाज या मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी 29 मे 2014 रोजी स्वीकारला. ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. केंद्रात मंत्रिपदावर बसताच त्यांनी पाच हजार कोटींच्या रस्त्यांचे काम हातात घेतले. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कामाची कॉस्ट, सिमेंट आणि स्टील यामुळे वाढते हे त्यांना चांगले माहीत आहे. त्यांनी ते सिमेंट देशाच्या इन्फ्रास्टक्चरच्या कामात अत्यंत अल्प दरात मिळवले आणि कामाच्या खर्चाची रक्कम खूप वाचवली, ही नावाजण्यासारखी कामगिरी त्यांनी केली आहे. पीपीपी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणि बीओटीः बांधा वापरा आणि हस्तांतरित करा, या कामात त्यांचे संशोधन अतुलनीय आहे. महाराष्ट्रात असे उपक्रम राबवण्याचा प्रघात खर्या अर्थाने त्यांच्यापासून पडला, असे म्हणावे लागेल. ‘एकदा एखादे काम हाती घेतले की, ते पूर्ण करायचेच, ही माझी कामाची पद्धत आहे. समोर आलेल्या अडचणींवर थेट धडक देणे मला आवडते’, असे याबाबत ते मनमोकळेपणाने सांगतात.
आज त्यांचा 61 वा वाढदिवस आहे. महाल, हा त्यांचा नागपुरातील वाडा हे त्यांचे प्रसिद्ध निवासस्थान. त्यांना पूलकरी या टोपणनावाने महाराष्ट्र ओळखतो. दादासाहेब धनवटे नगर विद्यालय, नागपूर आणि जी. एस. कॉमर्स कॉलेज, नागपूर येथे त्यांनी आपल्या शिक्षणाचे धडे घेतले. शाळा-कॉलेजातील त्यांचे सवंगडी प्रेमाने त्यांना भेटतात. त्यांची मैत्री ही राजकारणापलीकडे जाऊन ते जपतात. एक यशस्वी उद्योजक, अशीही त्यांची ओळख आहे. आजही त्यांच्या सार्वजनिक उपद्व्यापात त्यांच्या कुटुंबाची खरी साथ त्यांच्या पत्नी कांचन गडकरी सांभाळतात. निखिल, सारंग आणि केतकी ही त्यांची अपत्ये. इतक्या धकाधकीतही ते आपल्या कुटुंबाकडे काळजीपूर्वक लक्ष देतात, असे त्यांच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. घरगुती पूजा, कार्यक्रम, गेट टू गेदर ते काळजीपूर्वक हजेरी लावतात. संस्कारभारती, संवादिनी या कार्यक्रमांनाही त्यांची हजेरी असते. फिल्मी संगीत ऐकणे आणि चवीचे वेगवेगळे पदार्थ खाणे हा त्यांचा खास छंद. त्यांच्या मुंबईतील तत्कालीन रॉकी हिलवरील निवासस्थानी त्यांच्याबरोबर भोजनाचा आनंद मीही एकदा घेतला. तेव्हा त्यांनी मारलेल्या गप्पा आजही माझ्या स्मरणात आहेत. अगदी मनमोकळेपणाने बोलणारा आणि अजिबात अवघड न वाटणारा असा हा अफलातून अवलिया, असेच त्यांना म्हणावे लागेल. उच्च वर्गातील घरात जन्म घेऊनही आजही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत.
त्यांनी 27 मे 1995 ते 1999 या कार्यकाळत सार्वजनिक बांधकाम विभाग व पालकमंत्री, नागपूर, या पदावर काम केले. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष, माजी विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद, माजी-सदस्य(आमदार), महाराष्ट्र विधान परिषद, माजी सदस्य, हाय पॉवर कमेटी फॉर प्रायव्हेटायझेशन, महाराष्ट्र शासन. माजी-अध्यक्ष, महाराष्ट्र रस्तेविकास महामंडळ, अध्यक्ष, प्रधानमंत्री, ग्राम सडक योजना, असा राजकीय प्रवास केला आहे. विधान परिषदेत भाजपकडून गडकरी आणि शिवसेनेकडून दिवाकर रावते ही जोडी खूपच आक्रमक होती. गडकरी उभे राहिले की सत्ताधारी मंत्र्यांचे धाबे दणाणलेच म्हणून समजा. निर्णय किंवा आश्वासन पदरात पाडून घेतल्याशिवाय ते खाली बसायचेच नाहीत. रावतेंचा आणि त्यांचा आक्रमकपणा म्हणजे ब्लड प्रेशरचा स्फोट होतो की, काय असे सार्यांना वाटायचे. रोल सत्तेतला असो की, विरोधी बाकावरचा गडकरींनी तो अत्यंत सफाईदारपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडला आहे. काही बाबतीत त्यांचे रोखठोक मते असतात. ‘कुठल्याही दूरचित्रवाणी वाहिनीवर भगवे कपडे परिधान केलेला कुणी दिसला की, लगेच त्याचा संबंध भारतीय जनता पक्षाशी जोडला जातो. वस्तुस्थिती तशी नाही. भगव्या कपड्यातील प्रत्येकजण भाजपचाच असतो असे नाही’, असे ते ठामपणे सांगतात. गोरक्षकांचे ते समर्थन अजिबात करत नाहीत. ते आमच्या पक्षाशी संबंधित नाहीत, असे त्यांचे म्हणणे असते. ‘भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार गोहत्याबंदीच्याच बाजूने ठामपणे उभा आहे. मात्र, गोवंश रक्षकच्या नावाखाली चालणारी गुंडगिरी, हिंसाचार आम्हाला मान्य नाही’, असे रोखठोक मत ते मांडतात. सारे भारतीयच सहिष्णु आहेत. असे प्रांजळपणे सांगणारा नेता आज त्याच्या एकसष्टीनिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
राजा आदाटे – 8767501111