वाढत्या इंधन दरवाढीचा दुचाकी ढकलून बोदवडमध्ये निषेध

0

तहसीलदार प्रशासनाला निवेदन : मंत्री राम कदमांच्या वक्तव्याचा जिल्हाध्यक्षांनी घेतला समाचार

बोदवड- इंधनाच्या दररोज सातत्याने वाढत असलेल्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून त्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी दुचाकी ढकलत आंदोलन करून तहसीलदार प्रशासनास निवेदन दिले. भाजपाचे मंत्री राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील यांनी चांगलाच खरपूस समाचारही घेतला.

केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराविरुद्ध टिका
इंधनाच्या दररोज वाढत चाललेल्या किंमती, रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, शेतकरी कर्जमाफी व बोंड अळीचे अनुदान मिळण्यास होणार्‍या दिरंगाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांतर्फे बुधवारी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात दुपारी 12 ते एक या वेळेत दुचाकी ढकलून आंदोलन करण्यात आले. प्रभारी तहसीलदार डी.एस.कुसकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते तहसील कार्यालयापर्यंत दुचाकी ढकलून आंदोलन झाले. केंद्र व राज्याच्या चुकीच्या धोरणामुळे इंधनाचे दर सातत्याने वाढून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याने पदाधिकार्‍यांनी संताप व्यक्त करीत वाढत्या महागाईसह कर्जमाफीच्या धोरणावर सडकून टिका केली.

मंत्री कदमांच्या हकालपट्टीची मागणी
स्वतःला हरी भक्त म्हणणारे मंत्री राम कदम यांनी मुलींबद्दल अत्यंत लज्जास्पद वक्तव्य केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करण्यात आला व त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांनी केली.

यांचा आंदोलनात सहभाग
जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, तालुकाध्यक्ष डॉ.उद्धव पाटील, गटनेता देवेंद्र खेवलकर, शिवाजी ढोले, कडू माळी, मधुकर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विजय पालवे, सतीश पाटील, आबा पाटील, प्रमोद धामोडे, लालसिंग पाटील, नीना पाटील, दीपक झांंबड, शालिग्राम काजळे, जगन शेळके व 200 कार्यकर्ते उपस्थित होते.