वाढत्या गरमीने एसी लोकलला आले अच्छे दिन

0

मुंबई । सध्या वाढत्या गर्मीमुळे मुंबईकर पुरते हैराण झाले आहेत. गरमीपासून दिलासा मिळावा, यासाठी थंड पेय असो किंवा इतर काही साधनांचा लोक वापर करताना दिसत आहेत. मात्र, आता मुंबईत वाढलेल्या या गरमीमुळे चक्क एसी लोकलला अच्छे दिन आले आहेत. बहुचर्चित आणि प्रतीक्षित एसी लोकल 25 डिसेंबरचा मुहूर्त गाठत मुंबईकरांच्या सेवेत आली. पण, सेवेत आल्यापासून एसी लोकलला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. पण, मार्च महिन्यापासून मुंबईतील गरमी मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्याचा फायदा एसी लोकलला झाला.

एसी लोकलला जसा प्रतिसाद जानेवारी-फेब्रुवारी मिळत होता. त्यापेक्षा दुप्पट प्रवाशांची गर्दी या एसी लोकलमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. शिवाय, एसी लोकलला आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पश्‍चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकार्‍यांनी सांगितले आहे. आतापर्यंत 7 लाख 28 हजार 515 प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला आहे. त्यातून 3 कोटी 17 लाख 91 हजार 526 रुपयांचा नफा पश्‍चिम रेल्वेला झाला. शिवाय, जूनपर्यंत तरी अशीच परिस्थिती राहिल्यास प्रवाशांचा आणखी चांगला प्रतिसाद मिळू शकेल, अशी अपेक्षाही जनसंपर्क अधिकारी यांनी व्यक्त केली आहे.

डिसेंबर ते मार्चपर्यंत एसी लोकलची कमाई
डिसेंबर 2017 – 9009 प्रवासी – 4 लाख 99 हजार 927 रुपये
जानेवारी 2018 – 1 लाख 77 हजार 447 प्रवासी – 81 लाख 25 हजार 655 रुपये
फेब्रुवारी 2018 – 2 लाख 28 हजार 859 प्रवासी – 99 लाख 23 हजार 60 रुपये
मार्च 2018 – 3 लाख 13 हजार 200 प्रवासी – 1 करोड 32 लाख 42 हजार 884 रु.
डिसेंबर ते मार्चपर्यंत एसी लोकलने एकूण 3 कोटी 17 लाख 91 हजार 526 रुपयांचा नफा कमावला आहे.