वाढत्या गैरप्रकारांमुळे महापालिकेचे बर्ड व्हॅली उद्यान बदनाम

0

नागरिकांकडून गैरप्रकाराला खतपाणी : सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

पिंपरी-चिंचवड : महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून बर्ड व्हॅलीसारखे शहरातील उत्कृष्ट असे पर्यटन केंद्र विकसित केलेले आहे. परंतु, हे पर्यटन केंद्र गुन्हेगारीशी संबधित घटना व दैनंदिन होणार्‍या गैरप्रकारांमुळे बदनाम होत आहे. हे गैरप्रकार रोखण्यासाठी महापालिका प्रशासन व पोलिस यंत्रणेने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केली आहे.

ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची पाठ
यासंदर्भात गोरखे यांनी पत्रकात म्हटले आहे की, चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये टेल्को रस्त्यालगत बर्डव्हॅली उद्यान आहे. कोट्यवधी रुपये खर्चून पालिकेने हे उद्यान विकसित केले. शहराबरोबर पुणे व इतर ठिकाणाहूनही लोक आवर्जून भेट देण्यासाठी येतात. मात्र, तेथे घडणा-या अप्रिय घटनांमुळे हे पर्यटन स्थळ बदनाम झाले आहे. या परिसरात आत्महत्या, खून, मारामार्‍यासारख्या घटना घडतात. या उद्यानात येणा-या तरुण-तरुणींकडून गैरप्रकार केले जातात. या गैरप्रकारामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह नागरिक बर्डव्हॅली उद्यानात जाणे टाळतात

उद्यानातील साधने नादुरूस्त
या ठिकाणी सुरक्षाविषयक आवश्यक काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते. उद्यानातील साधनांची दुरावस्था झालेली आहे. पालिकेमार्फत देखभाल दुरुस्ती, सुरक्षेचे काम ठेकेदारांना दिले आहे. मात्र, ठेकेदार पैसे घेऊनही नीट काम करत नाहीत. योग्य कामे केली जात नसून उलट येणार्‍या पर्यटकांना येथील ठेकेदारी कर्मचार्‍यांकडून अरेरावी केली जाते. उद्यानातील सुविधा व उपाययोजनांबाबत सुधारणा होणे गरजेचे आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने पालिका व पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात.