वाढत्या महागाईसह शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसणार्‍या सरकारविरोधात रावेरात मोर्चा

0

मोदी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी ; राष्ट्रवादीने केले धरणे आंदोलन

रावेर- मोदी सरकार हाय हाय, फसवणूक करणार्‍या सरकारचा जाहीर निषेध, बेरोजगारांना नोकर्‍या मिळाल्याच पाहिजे, शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, महागाई कमी झालीच पाहीजे आदी घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शनिवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी नायब तहसीलदार कविता देशमुख यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे
राष्ट्रवादी पक्ष जनहिताच्या प्रश्नासाठी शनिवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे रूपांतर मोर्चात होऊन येथील तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी दिलेल्या निवेदनात पेट्रोल-डिझेल गॅसची दरवाढ कमी झाली पाहिजे, रावेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकर्‍यांच्या धान्यासाठी खरेदी केंद्र सुरू करावे, शेतकर्‍यांचे शेतीचे वीज बिल माफ करावे, रस्त्यांवर बिल माफ करावे, रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावे यासह अनेक मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, राजेंद्र चौधरी उर्फ राजू ठेकेदार, युवकध्यक्ष राजेंद्र चौधरी, प्रल्हाद बोंडे, शेख महेबूब, किरण तायडे, योगेश कोळी, संदीप पाटील, एल.डी.डी.निकम, शेख इमरान, प्रकाश तायडे, शिवाजी पाटील, भागवत चौधरी, लक्ष्मण माळी, समाधान साबळे, किशोर पाटील, जिजाबराव पाटील, सईद खान, अनिल असेकर, काबीर तडवी यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या मोर्चात फौजदार अमृत पाटील, पोलिस राजेंद्र करोडपती, अजय खंडेराव यांनी बंदोबस्त ठेवला.