वाढत्या वजनाला नियंत्रण करण्याची जबाबदारी ही तुमचीच आहे – डॉ. दीक्षित

0

संत श्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला : ‘मधुमेह प्रतिबंध आणि विनासायास वेटलॉस’ वर मार्गदर्शन

पुणे : तुमच्या वजनाची जबाबदारी दुसर्‍या कोणी घ्यावी, ही प्रत्येकाची मानसिकता आहे. हे चुकीचे आहे. जो पर्यंत जीभेचे चोचले पुरविले जातील तो पर्यंत तुमच्या शरीरात अतिरिक्त ऊर्जा ही चरबीच्या स्वरुपात साठविली जाणारच. त्यामुळेच तुमच्या वाढत्या वजनाला नियंत्रण करण्याची जबाबदारी ही तुमचीच आहे, असे दीक्षित डाएटचे संस्थापक व जगप्रसिध्द मधुमेह तज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितले.

विश्‍वशांती केंद्र (आळंदी), पुण्यातील माईर्स एमआयटी आणि संतश्री ज्ञानेश्‍वर- तुकाराम स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनाअंतर्गत माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्‍वर सभागृहात 23 वी तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेतील ‘मधुमेह प्रतिबंध आणि विनासायास वेटलॉस’ या विषयावर ते बोलत होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. याप्रसंगी प्रा. राहुल कराड, प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. आय. के. भट, कुलगुरू डॉ. सुनील राय, डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.

खाण्याच्या सवयीला नियंत्रित ठेवा

दिवसातून दोन वेळा जेवण करणे, 45 मिनिटात साडे चार कि.मी. चालणे हा 90 दिवसांचा प्रयोग स्वतःवर करून बघा, त्याने लठ्ठपणा कमी होऊन संपूर्णपणे मधुमेहावर विजय मिळविता येईल, असा आरोग्याचा महत्वपूर्ण सल्ला डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी यावेळी श्रोत्यांना दिला. जीवनशैलीत बदल झाल्यामुळे इन्सूलिन निर्मितीमध्ये सुद्धा बदल झालेला दिसून येतो. मुख्यतः इन्सूलिन हे 50 टक्के पायाभूत स्त्रोत व 50 टक्के खाण्यामुळे निर्माण होते. त्यामुळेच खाण्याच्या सवयीला नियंत्रीत करणे गरजेचे आहे. वजन हे 19 ते 34 या वयात अधिक वाढते, अशा वेळेस कष्ट करावयाची व व्यायामाची सवय लावली तर मधुमेहासारखे आजार टाळू शकतो, असे त्यांनी पुढे सांगितले.

जेवण करण्याची पद्धत शिका

इन्सूलियनचे सर्वात मोठे कार्य हे शरीरात ऊर्जा साठविण्याचे असते. तसेच, इन्सूलिनची लेवल कमी करण्यासाठी दोन वेळा जेवण करा, दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नये, जेवताना शक्यतो गोड कमी खा, शक्यतो टाळा आणि जेवणात प्रथिने वाढवा. आपल्या शरीराला डस्टबिन बनविण्याऐवजी जेवण करण्याची पद्धत शिका. सुरुवातीला फळे खावे, नंतर सॅलेड, मोड आलेले कडधान्य, भाजी पोळी आणि शेवटी दूध प्यावे. तसेच दोन जेवणामध्ये केवळ पाणी, ताक, ग्रीन टी, नारळ पाणी किंवा टोमॅटोच्या दोन फोडी खाव्यात. भूक लागणे ही आपली मानसिक दशा आहे. त्यामुळे भुकेपेक्षा कमी खाणे शरीरासाठी उत्तम आहे, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले. प्रा. चारूदत्त कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर प्रा. डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी आभार मानले.