महिन्याला हजार मीटरची मागणी; स्वतंत्र ग्राहक केंद्राची मागणी
वाघोली : वाघोली येथील एकाच सहाय्यक अभियंता कार्यालयामार्फत 43 हजाराच्यावर ग्राहकांचा कारभार चालत असून वाढत्या नागरीकरणामुळे ग्राहकांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाली असून साधारणतः दर महिन्याला एक हजार मीटर पेक्षाही जास्त मागणी असल्यामुळे ग्राहकांना वेळेत सेवा देण्यासाठी अधिकारी व कर्मच्यार्यांवर प्रचंड ताण येत आहे. वाढती ग्राहकांची संख्या लक्षात घेता कर्मचारी वाढवण्याची मागणी ग्राहकवर्गातून केली जात आहे.
वाघोली येथे महावितरण विद्युत कंपनीचे सहाय्यक अभियंता कार्यालय असून एक सहाय्यक अभियंता व 14 कर्मचारी सद्यस्थितीत कार्यरत आहेत. हडपसर ग्रामीण उपविभागीय कार्यालयांतर्गत वाघोली, पेरणे, फुरसुंगी आणि उरुळी देवाची अशी चार शाखा कार्यालये असून यामध्ये शाखा 2 चे कार्यालय वाघोली येथे आहे. वाघोलीत 43 हजाराच्यावर इतके ग्राहक आहेत. मीटर जोडणी, बिल वसुली, बिल दुरुस्ती, वीज चोरी, ग्राहकांच्या तक्रारी आदि विविध कामे हाताळतांना अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रचंड ताण येत आहे.
कर्मचार्यांच्या आरोग्यावर परिनाम
कर्मचारीवर्ग अपुरा आणि ग्राहक संख्या मोठी असल्यामुळे ग्राहकांना वेळेत सेवा देणे जिकरीचे होते. अशावेळी ग्राहक वरिष्ठांना तक्रार करून दबाव तंत्राचा वापर करतात. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांची मानसिकता ढासळून त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येते. ग्राहकांची तत्पर काम व्हावे अशी अपेक्षा असते मात्र अतिरिक्त कामाचा ताण आणि कर्मचारी कमी असल्यामुळे अनेकवेळा वादावादीचे प्रकारही घडत आहेत. ग्राहक, वरिष्ठ व कामाचा समतोल सांभाळतांना विद्युत अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच दमछाक होते.
आमदारांनी घेतली बैठक
गेली पंधरा दिवसापूर्वी आ. बाबुराव पाचर्णे यांनी महावितरण विद्युत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व ग्राहक यांची बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या एकूण घेतल्या होत्या आणि त्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी 1 एप्रिल पासून वाघोली येथे उपविभागीय कार्यालय कार्यान्वित होणार असल्याची माहिती महावितरण पुणे जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी बैठकी दरम्यान दिली होती. उपविभागीय कार्यालय झाल्यास येथील अधिकारी व कर्मचार्यांचा ताण कमी होणार आहे.
वीजग्राहकांनी संयम ठेवावा
विद्युत कंपनीने तत्पर आणि चांगली सेवा द्यावी अशी ग्राहकांची अपेक्षा असते तशीच विद्युत कंपनीची सुद्धा ग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरावे अशी अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे केवळ विद्युत कंपनीचे अधिकारी, कर्मचारीच दोषी आहेत असे नाही .43 हजारांच्यावर ग्राहकांची संख्या असतांनाही तारेवरची कसरत करून संबधित अधिकारी, कर्मचारी ग्राहकांना शक्य ती सेवा देण्याचा प्रयत्न करत असतांना ग्राहकांनी वादावादी न करता संयम दाखवून सहकार्य करणे तेवढेच आवश्यक आहे.
तक्रार निवारण केंद्र
स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र उभारल्यास अपुर्या कर्मचारी, अधिकार्यांवर कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल आणि कामकाजामध्ये सुद्धा सुरळीतपणा आल्यामुळे ग्राहक व कर्मचारी यांचेमध्ये होणार्या वादावादीचे प्रकार थांबतील.
ग्राहकांनी कुठल्याही एजन्सीला न भेटता प्रत्यक्ष कार्यालयाशी संपर्क करावा त्यामुळे ग्राहकांची आर्थिक लुट होणार नाही. ग्राहकांना वेळेत व चांगली सेवा देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो मात्र अपुरा कर्मचारीवर्ग असल्यामुळे वेळेत काम मार्गी लावणे कधी कधी शक्य होत नाही. वाढत्या ग्राहक संख्येमुळे प्रचंड ताण येतो. ग्राहकांकडून सुद्धा सहकार्य असणे गरजेचे आहे
– नंदराम वैरागर, सहाय्यक अभियंता, वाघोली