जळगाव। आज समाजात प्रचंड बदल घडलेला आहे. गाव-शेती-शेतकरी यांचे प्रश्न बदलले आहेत. गावगाडा बदलल्यामुळे ग्रामीण माणसाच्या जगण्यात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. संवेदना हरवल्या आहेत. त्यामुळे आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे. असे मत चांदवड येथील प्रसिद्ध कवी, चित्रकार विष्णू थोरे यांनी व्यक्त केले. मूळजी जेठा महाविद्यालयातील साहित्य मंडळाच्या उदघाटनसमारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठीतील प्रसिद्ध कवींच्या कवितांबरोबर स्वरचित कविता सादर केल्या.
तुटत चाललेला संवाद आजचा प्रमुख प्रश्न
‘मनातल्या गुपिताच खोल तू राज ग, इश्काच्या इलाजाची दवा मला पाज ग’ अशा कवितांनी रसिकांना चिंब भिजवले. मोबाईलच्या जमान्यात आपला कुटुंबियांशी तुटत चाललेला संवाद हा आजचा प्रमुख प्रश्न आहे. त्यामुळे माणसामाणसामध्ये अंतर निर्माण झाले आहे. ही भयावह गोष्ट असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ‘जीव लावून मातीला व्हावे आभाळ पोरके, तसे तुमचे माझे नाते नाही निरोपासारखे’ अशा अस्वस्थ करण्यार्या कवितांमधून त्यांनी विद्यार्थ्यांना अस्वस्थ आणि अंतर्मुख केले. कविता ही माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. मोबाईलच्या जगातून आपण पुस्तकांच्या जगात यायला हवे. त्यामुळे आपले जगणे समृध्द होईल असेही त्यांनी सांगितले.