बारा तरुण निगडी पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी-चिंचवड : मित्राच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्याची शक्कल लढवून चक्क केकच कोयत्याने कापला. हे धाडस बारा तरुणांना चांगलंच महागात पडलं असून वाढदिवस साजरा करणा-या 12 तरुणांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 06) रात्री आठच्या सुमारास सेक्टर नंबर 24 प्राधिकरण येथील संत कबीर गार्डन येथे घडला.
ही आहेत तरुणांची नावे
शुभम अमर नरिया (वय 18, रा. दत्त कालापुरे चाळ, खराळवाडी, पिंपरी), सागर शिवा शिंदे (वय 18, भीम क्रांती नगर, स्पाईन रोड ओटा स्कीम, निगडी), साहिल रमजान शेख (वय 18, रा. ओटा स्कीम, निगडी), संदीप मारुती लोहेकर (वय 20 रा. एच ए कॉलनी, बी 28, पिंपरी), रामचंद्र सुनील नाफडे (वय 19 रा. मेथडी चर्च समोर, निगडी), सुमित शिवाजी कोळपे (वय 19, रा. संघर्ष हाऊसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी), मल्हार नागेश गोरे (वय 19, खराळवाडी, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच अन्य पाच अल्पवयीन मुलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कबीर गार्डनमध्ये केली हुल्लडबाजी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरण येथील संत कबीर गार्डन जवळ काही तरुण मोठमोठ्याने आरडा-ओरडा करत दंगा करीत आहेत. अशा प्रकारची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर संत कबीर गार्डन येथे बारा तरुण मित्राच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने करीत होते. लोखंडी कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केला जात असल्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. यावरून पोलिसांनी बारा तरुणांना ताब्यात घेतले. तरुणांकडून तलवारीच्या आकाराचे दोन लोखंडी कोयते व चार वाहने असा एकूण दोन लाख, 40 हजार, 400 रुपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे.
तळेगावमध्येही असाच प्रकार
दरम्यान, तळेगाव दाभाडे पोलिसांनी 27 फेब्रुवारी रोजी अशाच प्रकारे भर रस्त्यावर मित्राच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करणा-या सात तरुणांना पोलीस कोठडीची हवा खायला घातली होती. यामुळे मावळ भागात सामान्य नागरिकांना त्रासदायक असणा-या आगळ्या-वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणा-यांवर जरब बसली आहे. त्यानंतर एका आठवड्याच्या आत शहरात हा प्रकार घडला असल्याने आजची तरुणाई बिथरली असल्याची चर्चा सुरु आहे.