पिंपरी ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात एका तरुणाच्या वाढदिवसानिमित्त रक्ताने माखलेले कोंबडीचे तोंड, पत्त्यातील जोकरचे पान आणि तरुणाचे उलट्या दिशेने लिहिलेले नाव अशा गोष्टी आढळल्या. तसेच डब्याचे फोटो ‘व्हाय सो सीरियस’ या इन्स्टाग्रामवरील फेक अकाऊंटवरुनही शेअर केले आहेत. हा प्रकार गेल्या दीड महिन्यापासून सुरु आहे. यामुळे कुटुंबिय भयभीत झाले असून दहशतीच्या सावटाखाली आहे. याप्रकरणी त्यांनी सांगवी आणि पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालय शिक्षा देईल
पिंपळेगुरव येथे राहणार्या जयकुमार भुजबळ याचा दहा एप्रिलला वाढदिवस होता. त्याच्या आदल्या दिवशी हा प्रकार घडला. त्यानंतर 10 एप्रिल रोजी सकाळी भुजबळ कुटुंबीयांच्या गाडीवर जोकर वगळता पत्त्यातील इतर पत्ते फेकण्यात आले होते. तसेच काळ्या रंगापासून झालेली सुरुवात लाल रंगावर संपेल, अशी धमकीही अज्ञाताने दिली आहे. या अघोरी भेटवस्तूंमुळे भुजबळ कुटुंबिय भयभीत झाले असून दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत. याबाबत जयकुमार भुजबळ म्हणाला की, हे प्रकार गेल्या दीड महिन्यांपासून घडत आहे. हे कृत्य कोण करत आहे आणि कशामुळे करत आहे, हे समजत नाही. आमचा कोणावरही संशय नाही. याबाबत सांगवी आणि पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी जे कोणी आरोपी असतील त्यांना लवकर पकडावे. न्यायालय त्यांना योग्य ती शिक्षा देईल.
तपास सुरू
याबाबत बोलताना परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, जयकुमार भुजबळ यांच्या घरातील अंगणासमोर हे खोके ठेवले होते. जयकुमार याने चिंचवड, मोहननगर येथे त्याची मोटार पार्क केली होती. मोटारीवर देखील अज्ञातांनी काळा रंग फेकला आहे. याप्रकरणी सांगवी आणि पिंपरी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.