वाढदिवस साजरा न करता शैक्षणिक साहित्यासाठी केली मदत

0

माजी विद्यार्थ्यांने जोपासले ऋणानुबंध

निगडीः रूपीनगर येथील ज्ञानदीप विद्यामंदिर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी चौधरी कुटुंबीयांकडून मदत करण्यात आली. युरोप फिनलँडमध्ये वास्तव्यास असणार्‍या चौधरी यांनी आपल्या शाळेसोबत असलेले आपले ऋणानुबंध कायम ठेवले. या शाळेचे सभापती सुभाष चौधरी यांचा नातू व दत्तात्रय चौधरी यांचा मुलगा राज दत्तात्रय चौधरी हा देखील फिनलँड येथेच असतो. आपला वाढदिवस शाळेतील मुलांची मदत करून साजरा करण्याचे त्याने ठरवले आणि संपूर्ण कुटुंबाने यास होकार दिला.

त्यानुसार शाळेतील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदत केली. यावेळी संस्थेचे संचालक कुंडलिक वर्‍हाडी, संपत भालेकर, शाळेचे माजी विद्यार्थी दत्तात्रय सुभाष चौधरी, अश्‍विनी चौधरी, सरस्वती चौधरी, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र सोनवणे, मुख्याध्यापक शिवशरण सालोटगी, शिक्षक व पालक उपस्थित होते. याप्रसंगी रविंद्र सोनवणे म्हणाले, समाजातील सर्व घटकांनी वाढदिवसावर अवाढव्य खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपून गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करावी.