रावेर तालुक्यात वादळी वार्‍याने केळीला मोठा फटका

केळी उत्पादकांचे लाखोंचे नुकसान : झाडाची फांदी पडल्याने युवक जखमी

रावेर : तालुक्यातील अहिरवाडी परीसरात सोसाट्याच्या वार्‍यासह झालेल्या वादळामुळे केळीचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. 28 वर्षीय युवकाच्या डोक्यावर झाडाची फांदी पडल्याने युवक जखमी झाला तर काही घरांवरील पत्रेदेखील उडाल्याचे वृत्त आहे. या परीसरातील काही प्रमाणात पाऊसदेखील झाला.

युवक झाला जखमी
अहिरवाडी परीसरात मंगळवारी जोरदार वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे अनेक शेतकर्‍यांच्या केळी बागेला मोठा फटका बसला. अहिरवाडी गावातील काही घरांवरील पत्रे उडाली तर प्रशांत कौतीक सावळे हा युवक गुरांच्या गोठ्यामध्ये जात असताना त्याच्या डोक्यावर सुळबाभूळ या झाडाची फांदी पडल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली तर गोपाळ धनगर या शेतकर्‍याची केळी बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. घटनेची माहिती मिळताच संदीप सावळे घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.