वापरात नसलेले पाणी जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार 

0
रेल्वे बंधार्‍यातून पाण्याची उचल करण्याबाबतही सकारात्मकता
भुसावळ:- शहरवासीयांची पाण्यासाठी होत असलेल्या भटकंतीनंतर सत्ताधार्‍यांच्या नियोजनशून्य कारभारावर टिकेची झोड उठली असताना दैनिक जनशक्तीने रविवारच्या अंकात याबाबत सडेतोड लिखाण करून सत्ताधार्‍यांचे लक्ष वेधले होते. वृत्ताची दखल घेत पदाधिकार्‍यांनी तापीच्या बंधार्‍याची पाहणी करून वापरात नसलेली पाणी जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी उपाययोजना करण्याची तयारी दर्शवली असून रेल्वेनही पाण्याची उचल करण्याबाबत तत्वतः सकारात्मक दर्शवली आहे.
लोकप्रतिनिधींसह अधिकार्‍यांनी केले सर्वेक्षण
पाणी प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी रविवारी पाटबंधारे, पालिका, रेल्वे व अमृतचे काम घेतलेल्या जैन इरिगेशन या कंपनीच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेतली. आमदार सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक निर्मल कोठारी आदींनी तब्बल तीन तास नदीपात्रात अधिकार्‍यांसोबत सर्वेक्षण करून पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी काही निर्णय घेतले. यात प्रामुख्याने रेल्वेचा बंधारा आणि नदीपात्रातील उत्तरेकडील डोहांतून ग्रॅव्हीटी सायपन यंत्रणेव्दारे पाण्याची उचल करणे, यासह नदीपात्रात वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून नवीन आठ ते नऊ पोल टाकून 80 अश्वशक्तीचा वीजपंप बसवून त्याव्दारे पाण्याची उचल करुन वापरात नसलेले पाणी पालिकेच्या जॅकवेलपर्यंत पोहचवणे, दीपनगर अर्थात सुदगाव बंधार्‍यातून किमान दहा दिवसांचे पाणी मिळवणे, रेल्वेच्या सध्या वापरात नसलेल्या जॅकवेलचा प्रभावी वापर करणे आदींसह अन्य विषयांवर निर्णय घेण्यात आले. पालिका बंधार्‍यात पाणी नसल्याने रेल्वे प्रशासनाने त्यांच्या बंधार्‍यातून पाणी उचल करण्याचे तत्वतः मान्य केले आहे. यामुळे शहरातील पाणीटंचाई काही प्रमाणात तरी निकाली निघणार आहे.
यांची होती उपस्थिती 
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस.विश्वे, जैन इरिगेशनचे अभियंता बी.एस.चौधरी, रेल्वेचे विभागीय अभियंता एम.एस.तोमर, रेल्वेचे अभियंता राजेंद्र देशपांडे, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर , एमजीपीचे कार्यकारी अभियंता एस.सी.निकम, पालिकेचे सेवानिवृत्त अभियंता ए.बी.चौधरी आदी अधिकार्‍यांसोबत नगरसेवक निर्मल कोठारी, अ‍ॅड.बोधराज चौधरी, अमोल इंगळे, समकित सुराणा आदी उपस्थित होते.