वायसीएममध्ये वैद्यकीय संस्था उभारणीचा घाट

0

यंदा परवानगी मिळण्याची दाट शक्यता

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय संस्था (इन्स्टिट्यूट) सुरु करण्यास अद्यापपर्यंत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परवानगी मिळाली नाही. ही परवानगी नसताना महापालिका प्रशासनाने वैद्यकीय संस्थेच्या शुभारंभाचा घाट घातला आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते येत्या गुरूवारी (दि.19) शुभारंभ करण्याचे नियोजित केले आहे.

पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असते. ही कमतरता भरून काढण्यासाठी कायम स्वरुपी उपाय म्हणून वायसीएम रुग्णालयात पदव्युत्तर मेडिकल संस्था सुरू करण्याचे पाऊल टाकण्यात आले. त्याकडे मध्यंतरी दुर्लक्ष झाले. त्यामुळे वैद्यकीय संस्था सुरु करण्यास गतवर्षी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परवानगी मिळाली नाही. यंदा परवानगी मिळावी, यासाठी पालिकेकेने प्रयत्न केले असून परवानगी मिळेल अशी, अपेक्षा पालिका प्रशासनाला आहे.

विविध पदांची भरती
या संस्थेसासाठी विविध 43 पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये औषध वैद्यक, स्त्री-रोग व प्रसृतीशास्त्र, कान, नाक, घसा, अस्थिरोग, बालरोग, जनरल सर्जरी, रेडीओलॉजी, मानसोपचार, भूलशास्त्र, पॅथोलॉजी, उरोरोग शास्त्र या विषयांसाठी प्रत्येकी एक प्राध्यापक असणार आहे. तर, विविध विषयांचे 26 सहयोगी प्राध्यापक देखील नेमले जातील. तसेच, कोडींग क्लर्क, अ‍ॅक्युपेशनल थेरीपेस्ट, डॉक्युमेंटलिस्ट, स्टँस्टिशियन कम असिस्टट प्रोफेसर, प्रोथेस्टिक अ‍ॅण्ड आर्थोटीक टेक्रीशियन, कँटालॉगर या पदावरही प्रत्येक एक जण भरती केला जाणार आहे.

यंदा परवानगी मिळण्याची शक्यता
पदव्युत्तर वैद्यकीय संस्था सुरु करण्यास यंदा परवानगी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्‍वभुमीवर आज (मंगळवारी) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बैठक घेऊन आढावा घेतला आहे. या बैठकीला सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका सुजाता पालांडे उपस्थित होत्या. दरम्यान, प्रत्यक्षात पदव्युत्तर वैद्यकीय संस्था सुरु करण्यास अद्यापपर्यंत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परवानगी मिळाली नाही. परवानगी नसतानाच पालिका प्रशासनाने वैद्यकीय संस्थेचा शुभारंभ करण्याचे नियोजन केले आहे. गुरुवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शुभारंभ करण्याचे नियोजित केले आहे. परवानगी नसतानाच शुभारंभ केला जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.