वारंवार होणार्‍या अपघातस्थळांचे सर्वेक्षण, उपाय करणार

0

धुळे। रस्त्यावरील एकाच ठिकाणी वारंवार होणार्‍या अपघातस्थळांचा ब्लॅक स्पॉट म्हणून सर्वेक्षण करण्यात येवून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. परिवहन अधिकारी, धुळे यांनी म्हटले आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार रस्ते अपघातातील मृतांच्या संख्येवर नियंत्रण प्राप्त निर्देशानुसार जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत रस्त्यावरील होणार्‍या अपघाती मृत पावणार्‍या संख्येच्या 10 टक्के कमी अपघात होतील यासाठी उपाययोजना सूचविण्यात येवून त्यास मान्यता दिलेली आहे.

अपघातस्थळांचे ब्लॅक स्पॉट म्हणून होणार सर्वेक्षण
रस्त्यावरील एकाच ठिकाणी वारंवार होणार्‍या अपघात स्थळांच्या ब्लॅक स्पॉट म्हणून सर्वेक्षण करण्यात येवून त्यावर उपाययोजना करण्यात येतील. सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करणार आहे. अपघातातील जखमी व्यक्तींना तातडीने वैद्यकीय मदत होण्याकरीता रुग्णवाहिका ट्रामा केअर सेंटर सुसज्ज ठेवण्यात येणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक विभाग, यांच्या मार्फत सदरच्या कामाची अंमलबजावणी होणार आहे. धुळे शहरातील सिग्नल यंत्रणा दुरुस्त करणेबाबतचे नियंत्रण समितीने धुळे महानगरपालिका यांना दिले आहे.

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्था
रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहभागी करुन घेणार आहे. त्यांना प्रचार व प्रसार करण्यासाठी अपघातकालिन परिस्थितीचे नियोजन करण्यासाठी सहभागी करुन घेण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवरील सूचविण्यात येणार्‍या सर्व उपाययोजना जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून राबविण्याकरीता आदेश देण्यात आल्याचे परिवहन अधिकारी, धुळे यांनी म्हटले आहे.