वारंवार होणार्‍या खंडीत वीजपुरवठ्याने उद्योजक झाले त्रस्त

0

भुसावळ औद्योगिक वसाहतीतील प्रकार : उपकेंद्राच्या जागेचा होतोय खाजगी वापर

भुसावळ- कंडारी शिवारातील सहकारी औद्योगिक वसाहतीमधील वीजपुरवठ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी 33/11 के.व्ही.उपकेंद्र उभारणीला परवानगी मिळाली होती. दहा महिन्यांपूर्वी या कामाचे लोकप्रतिनिधींच्या हस्ते भूमिपुजनही करण्यात आले मात्र दहा महिन्यानंतरही प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली नसल्याने या कामाला मोगरी लागल्याने काम रखडले आहे. कंडारी शिवारातील सर्व्हे क्रंमाक 168 व 169 मध्ये सहकारी औद्योगिक वसाहत उभारण्यात आली असून या वसाहतीमध्ये 45 लघू उद्योजकांनी आपली कारखानदारी थाटली आहे मात्र या कारखानदारांना भुसावळ उपकेंद्रावरून होणार्‍या खंडीत वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत होती. सहकारी औद्योगिक कार्यकारणी मंडळाने स्वतंत्र उपकेंद्राची लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती तर उपकेंद्र उभारणीला औद्योगिक वसाहतीमधील खुल्या भुखंडाची जागा देण्याचेही तयारी दशर्वली होती.

लघू उद्योजकांच्या आशेवर फिरले पाणी
त्यानुसार केंद्रपुरस्कृत एकात्मिक उर्जा विकास योजनेतंर्गत आठ हजार 120 चौरस फूट जागेवर 33/11 केव्ही उपकेंद्राच्या उभारणीला परवानगी मिळाली. मंजुरी मिळालेल्या या उपकेंद्राचे दहा महिन्यांपूर्वी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत भूमिपुजन पार पडले. सहकारी औद्योगिक वसाहतीमधील लघू उद्योजकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र दहा महिन्यांचा कालावधी होवूनही प्रत्यक्षात कामाला संबधीत ठेकेदाराने सुरूवात केली नसल्याने उपकेंद्राच्या कामाला मोगरी लागल्याने उद्योजकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

जागेचा खाजगी कामासाठी वापर
नियोजित 33/11 उपकेंद्राचे काम दहा महिन्यांपासून रखडले आहे मात्र उपकेंद्राच्या या जागेवर ठेकेदाराने उपकेंद्र निर्मितीचे काम न करता या जागेचा खाजगी साहित्य ठेवण्यासाठी उपयोग सुरू केला आहे. याबाबत औद्योगिक वसाहतीच्या कार्यकारणी मंडळाने ठेकेदारास विचारणा केली असता टोलवा-टोलवीचे उत्तरे दिली जात आहेत.

उद्योजक संभ्रमात
उपकेंद्रामुथे सहकारी औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांची वारंवार खंडीत होणार्‍या वीजपुरवठ्याची समस्या मार्गी लागणार असल्याने कारखानदारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र नवीन उपकेंद्राचे काम रखडल्याने वसाहतीमधील लहान-मोठे उद्योजक संभ्रमात पडले आहेत. आमदार संजय सावकारे यांनी पुढाकार घेवून रखडलेल्या उपकेंद्राच्या कामाला गती देण्याची मागणी होत आहे.

जागा देवूनही समस्या कायम
औद्योगिक वसाहतीमधील वीजपुरवठ्याची समस्या मार्गी लागावी यासाठी जिल्हाधिकारी, वीज वितरण कंपनीकडे आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून उपकेंद्राला वसाहतीमधील जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे मात्र उपकेंद्राचे काम रखडल्याने कारखानदारांची समस्या आजही कायम असल्याचे सहकारी औद्योगिक वसाहतीचे व्यवस्थापक खुशाल पाटील म्हणाले.