यावलकरांनी जपला जातीय सलोखा ; समाजमनातून कौतूक
यावल (शेख काबीज) : मजहब नहीं सिखाता हमे आपस में बैर रखना… या उक्तीला साजेसे कार्य यावल शहरातील मुस्लीम बांधवांनी करीत तीर्थक्षेत्र शेगावी निघालेल्या पायी दिंडीतील वारकर्यांच्या स्वागतासह त्यांना चहा-नास्त्याची व्यवस्था करीत हिंदू-मुस्लीम एकता अबाधीत असल्याचा प्रत्यय दिला. जात नाही ‘जात’ असे म्हटले जात असलेतरी यावलकर मात्र त्यास अपवाद ठरले आहेत.
वारी सुखरूप होण्यासाठी मुस्लीम तरुणांची प्रार्थना
यावल शहरात रविवारी राष्ट्रीय एकात्मतेचे एक वेगळेचं चित्र पहायला मिळाले. श्री संत गजानन महाराज शेगाव येथे तालुक्यातील साकळी येथुन निघालेल्या पायी दिंडीचे स्वागत भुसावळ रस्त्यावर असलेल्या हजरत घोडेपीर बाबा यांच्या दर्गाहवर नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या पुढाकाराने मुस्लिम तरूणांनी केले व तेथे दिंडीकरांना काही वेळ विश्रांती घेत जलपान, कॉफी व बिस्कीट देऊन त्यांची पायी यात्रा सुखरूप व्हावी यासाठी दुवा मागण्यात आली व एकतेचा संदेश देण्यात आला. साकळी, ता. यावल येथील श्री गजानन महाराज फाऊंडेशनच्या वतीने दर वर्षी पायी दिंडी निघते. रविवारी सकाळी साकळी गावातुन निघालेली दिंडी यावल-भुसावळ रस्त्यावरील हजरत घोेडेपीर बाबांच्या दर्गाहवर 11 वाजता पोहोचली. नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या पुढाकाराने दरगाहजवळ मंडप टाकुन दिंडीकराच्या विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली. प्रसंगी नदीम रजा खाटीक, अशपाक शाह, सैय्यद अरबाज, शोहेब अख्तर, समीर मोहंमद, जुनेद खान, शाहीर अहेमद, मनोज बारी, गौरव कोळी, निलेश बडगुजर, अतुल कचरे, स्नेहल फिरके आदींनी दिंडीत सहभागी भाविकांचे स्वागत केले. मुस्लिम तरुणांच्यावतीने दिडींकराना पुष्पगुच्छ देऊन दरगाह व कॉफी व बिस्किटचे वितरण करण्यात आले तसेच या सर्व दिंडीकरांची दिडी सुखरूप व्हावी या करीता दुवा पढण करण्यात आली. शहरासह तालुक्यात या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असून राष्ट्रीय एकात्मता वाढवणार्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.