महापालिका पुरविणार मुबलक सोयी-सुविधा : पोलिसांचा मोठा बंदोबस्त
पिंपरी-चिंचवड : जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी 333 वा पालखी सोहळा गुरुवारी प्रस्थान ठेवणार आहे. दुसर्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी पालखी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे. यानिमित्त वारकर्यांच्या स्वागतासाठी औद्योगिकनगरी सज्ज झाली आहे. पालिका प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्था भाविकांना सेवा,सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सज्ज झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवला आहे. सोहळ्यासाठी राज्याभरातून दिड्यांसह भाविक देहूगावात दाखल होत आहेत. पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असतो. दुसर्यादिवशी परंपरेप्रमाणे आकुर्डी येथे दुसरा मुक्काम असणार आहे.
दर्शनासाठी रांगा, कॅमेरे, ध्वनीक्षेपक
महापालिकेच्या वतीने पालखी आगमनापासून ते मार्गास्थ होण्यापर्यंत सर्व सोयी-सुविधा मुलबक प्रमाणात देण्यात येणार आहेत. भक्ती-शक्ती ते दापोडीच्या रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत. चर्होली ते दिघी मार्गावरील अडचणीच्या ठरणार्या झांडांची छाटणी केली आहे. आकुर्डीतील पालखीच्या मुक्काम तळावर सर्वांना दर्शन घेता यावे. महिला व पुरुषांसाठी वेगळ्या दर्शनरांगा करण्यात येणार आहेत. त्यासाठी बॅरीकेट लावले जाणार आहेत. ’सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले जाणार असून साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली जाणार आहे. तसचे अखंडीत विद्युत पुरवठा राहिल.
शौचालये, अग्निशामक बंब, पाणी टँकर
खासगी व महापालिकेच्या अशा 36 शाळांमध्ये वारकर्यांच्या राहण्याची व्यवस्था आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध आहेत, शिवाय तंबूमध्ये राहणार्यांसाठी आकुर्डीत 300 पोर्टेबल टॉयलेट असतील. ’फ’ क्षेत्रीय कार्यालयात 60 मोबाईल टॉयलेट असणार आहेत. खराळवाडी येथे 30 पोर्टेबल टॉयलेटची व्यवस्था असेल. देहू ते पंढरपुरपर्यंत पालखीसोबत पालिकेच्या अग्निशामक दलाचा चार कर्मचार्यांसह एक बंब असणार आहे. त्याचबरोबर पालिकेचे पाण्याचे दोन टँकर देखील पंढरपुरपर्यंत पालखीसोबत असतील. तसेच आकुर्डी तळावर रुग्णवाहिका असणार आहे. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर कचरा उचलण्यासाठी स्वच्छता पथके तयार आहेत.
प्रत्येक वारकर्याची चोख सुरक्षा
वारकर्यांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. एक पोलीस उपायुक्त, दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, 17 पोलीस निरीक्षक, 89 पोलीस उपनिरीक्षक, 600 पुरुष आणि 150 महिला पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. याशिवाय एक राज्य राखीव पोलीस दल, सोनसाखळी चोरी विरोधी पथक, महिला छेडछाड विरोधी पथक देखील असेल. महिला सुरक्षा, सोनसाखळी चोरी यावर पाळत ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. चोरांवर आणि संधीसाधूंवर पोलिसांचे बारीक लक्ष असणार आहे. तसेच स्वच्छता आणि पर्यावरण यांचा समतोल साधत जे नागरिक, स्वयंसेवी संस्था पालखी सोहळ्यात अन्नदान करतात अशा संस्थांनी अन्नदानासाठी प्लास्टिकचा वापर करू नये. त्याऐवजी नैसर्गिक स्रोतांपासून बनलेल्या वस्तूंचा वापर करावा.