वारकर्‍यांना नागरी सुविधा देण्यासाठी सजग रहावे;आयुक्तांच्या अधिकार्‍यांना सूचना

0

पिंपरीः आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात येणार्‍या वारकर्‍यांना अधिक सक्षमपणे नागरी सुविधा देण्यासाठी सजग राहण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकार्‍यांना दिल्या. निगडी, भक्ती-शक्ती परिसर व आकुर्डी गावठाण येथील विठ्ठल मंदिराच्या पालखी मुक्कामाच्या ठिकाणची मंगळवारी सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाहणी केली. त्यावेळी अधिकार्‍यांना त्यांनी सूचना केल्या. यावेळी ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसेवक जावेद शेख, प्रमोद कुटे, नगरसेविका वैशाली काळभोर, मीनल यादव, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, विशाल कांबळे आदी उपस्थित होते.

सोहळ्यासाठी सज्ज रहावे
पिंपरी-चिंचवड शहरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 6 जुलै रोजी आगमन होणार असून आकुर्डी येथे मुक्काम असणार आहे. तर संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन 7 जुलै रोजी होणार आहे. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व पदाधिकारी व अधिकारी यांच्या समन्वयाने आषाढीवारी पालखी सोहळ्याचे नियोजन करण्याबाबत तसेच पालिकेच्या सर्व संबधित अधिकार्‍यांनी आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडून या सोहळ्यात सहभागी वारकर्‍यांना सुविधा देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करून सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.