वारकर्‍यांना पंढरपुरपर्यंत मिळणार तीन टँकरद्वारे पिण्याचे पाणी

0

मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राबविला उपक्रम

नवी सांगवीः पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी-चिंचवड शहर यांच्यातर्फे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणार्‍या वारकर्‍यांसाठी पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी तीन टँकर मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही सेवा देहू-आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण पालखी मार्गावर देण्यात आले आहेत. या टँकरच्या लोकार्पण समारंभाला भंडारा डोंगर ट्रस्टचे सदस्य जगन्नाथ पाटील, मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, सखाराम जोशी, श्रीकृष्ण खडसे, श्रीकृष्ण फिरके, मल्हारराव येळवे, जनार्दन बोरोळे, जालिंदर दाते, प्रकाश बंडेवार, विजयराज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत कुरुलकर, सचिव वामन भरगंडे, आदिती निकम, भरत शिंगोटे, युवराज नलावडे, तसेच भिष्माचार्य ज्येष्ठ नागरीक संघ, संत गाडगेबाबा सेवा संघ, भैरवनाथ ज्येष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या टँकरचे पूजन करून ते वारकर्‍यांच्या सेवेत दाखल करण्यात आले. या टँकरद्वारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रामकृष्ण प्रासादिक दिंडी क्र. 221, संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्‍वर महाराज दिंडी समाज आणि ह.भ.प. मठाधिपती मुक्ताबाई पवार बेलगावकर दिंडी क्र. 59 अशा तीन दिंड्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे.

वारकर्‍यांसाठी पाण्याची सुविधा
ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार म्हणाले की, पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीतील वारकर्‍यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ट्रस्टतर्फे टँकर सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यंदाही वारकर्‍यांसाठी तीन टँकरद्वारे मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. हीच पांडुरंगचरणी आमची सेवा आहे.