वारजे जलशुद्धीकरण केंद्रासाठी फेरनिविदेचा निर्णय

0

वारजे । वारजे जलशुद्धीकरण केंद्र, खडकवासला रॉ वॉटर पंपिंग आणि जुने वारजे जलशुद्धीकरण केंद्र चालवणे आणि देखभाल दुरुस्ती करण्याची 10 कोटी 55 लाख रुपयांची निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्यायचे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी सांगितले. निविदा वादग्रस्त ठरल्याने ‘ब’ पाकीट उघडावे किंवा फेरनिविदा काढावी, असे आदेश नगरविकास खात्याने महापालिकेला दिलेले होते. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवून तांत्रिक कारणांची जंत्री पुढे करून ‘ब’ पाकीट उडण्यास टेंडर सेलने दोन आठवड्यांपूर्वी असमर्थता दर्शवली होती. त्या वेळी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनातील अधिकार्‍यांना धारेवर धरून जाब विचारण्यात आला होता. सोमवारी झालेल्या समितीच्या बैठकीत प्रशासनाने सविस्तर अहवाल सादर केला. त्यानंतर फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्रात 300 एमएलडी पाणी शुद्ध केले जाते. त्यासाठी आवश्यक रॉ पाणी खडकवासला पंपिंगमधून घेतले जाते. जुने वारजे जलकेंद्र येथे दहा एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध केले जाते. या कामासाठी आवश्यक असणारे रॉ पाणी गणपती माथा येथून उपसले जाते. या कामासाठी पालिकेकडे पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ आणि शेड्युलमान्य पदे नाहीत. त्यामुळे या कामासाठी पालिकेने निविदा काढली होती. व्ही. ए. टेक वाबाग, डिग्रेमाउंट प्रा. लि. आणि श्री समर्थ इलेक्ट्रिकल यांची निविदा आली. यामध्ये अपात्र करण्यात आल्याने श्री समर्थ इलेक्ट्रिकल यांनी राज्याच्या नगरविकास खात्याकडे तक्रार केली होती. त्यावर सुनावणी झाली होती. त्यात या निविदेचे ‘ब’ पाकीट उघडण्यात यावे किंवा नवीन निविदा काढण्यात यावा असे आदेश नगर विकास खात्याने दिले होते. ही निविदा वादग्रस्त ठरल्याने कमी कालावधीची निविदा काढावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्याचे मोहोळ यांनी सांगितले.