निगडीतील ज्ञानप्रबोधिनीत पार पडली कार्यशाळा
पिंपरी : स्वच्छ भारत मिशन (नागरी) व स्वच्छ महाराष्ट्र मिशन (नागरी) अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे वार्षिक नियोजनासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत 150 शिक्षकांनी सहभाग घेतला. प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात नुकतीच कार्यशाळा पार पडली. याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम.शिंदे, क्रिसिल या सल्लागार संस्थेचे अंकुर द्विवेदी उपस्थित होते.
विविध उपक्रमांची माहिती
यावेळी महापालिकेकडून स्वच्छ भारत मिशन (नागरी) व स्वच्छ महाराष्ट्र मिशन (नागरी) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक घरगुती शौचालय बांधणे, सार्वजनिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करण्यासाठी करण्यात येत असलेली कार्यवाही, शहरातील 100 टक्के नागरिकांचा घरोघरचा कचरा गोळा करण्याची सुविधा पुरविणे, कचर्याचे ओला कचरा, सुका कचरा व घरगुती घातक कचरा, असे विलगीकरण करण्याचे महत्व, कचर्याचे विल्हेवाटीबाबत महापालिका करीत असलेली कार्यवाही, प्लास्टिक कॅरीबॅगच्या बंदीबाबत शासनाने केलेल्या कायद्याची महापालिकेमार्फत करण्यात येत असलेली अंमलबजावणी, स्वच्छ सर्वेक्षणात महापालिकेची देश पातळीवरील आत्तापर्यंतची कामगिरी याबाबत सविस्तर माहिती गावडे यांनी दिली.
चांगल्या सवयी लागाव्यात
संस्कारक्षम विद्यार्थी घडविणारी शाळा असा ज्ञान प्रबोधिनी शाळेचा लौकिक आहे. विद्यार्थी दशेत होणारे संस्कार हे चिरकाल टिकणारे असतात. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन त्यांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागाव्यात, स्वच्छतेच्या विविध उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे, आवाहनही गावडे यांनी केले. शैक्षणिक वर्षात संस्थेच्या नावलौकीकाप्रमाणे अत्यंत चांगल्या प्रकारे स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविणेचा निर्धार ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाचे केंद्र उपप्रमुख प्राध्यापक मनोज देवळेकर यांनी व्यक्त केला.