धुळे । जिल्हा वार्षिक योजनेचा 2018-2019 चा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी संबंधित विभागांनी प्रस्ताव तत्काळ सादर करावेत. तसेच 2017-2018 चा मंजूर निधी खर्च करण्यासाठी प्रशासकीय मान्यता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मंगळवार येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. व्ही. घोरपडे, जिल्हा नियोजन अधिकारी एम.आर. वाडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
अहवालासाठी दोन महिन्याची मुदत
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, 2017-2018 मध्ये मंजूर निधी खर्च होण्यासाठी तत्काळ प्रशासकीय मान्यता घ्यावी. त्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी निश्चित केलेल्या कालमर्यादेतच खर्च झाला पाहिजे. तसेच उपयोगीता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. याशिवाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्समधील निर्देशानुसार धुळे जिल्ह्याचे 2017-2022 या कालावधीसाठी व्हीजन डॉक्युमेट तयार करावयाचे आहे. त्यासाठी आवश्यक माहिती दोन दिवसांत सादर करावी. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना व विशेष घटक योजना) 2017-2018 चा माहे ऑगस्ट 2017 अखेर झालेल्या खर्च, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना व विशेष घटक योजना) प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सादर करणे याबाबत सविस्तर आढावा घेतला. जिल्हा नियोजन अधिकारी श्री. वाडेकर यांनी प्रास्ताविक केले.