वाल्मीक नगरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

0

जळगाव। शहरातील शनिपेठ भागातील आसोदा रोड वाल्मीक नगर येथील रहिवाशी महिला बचत गटाच्या महिलांनी त्यांच्या भागात सुरू असणारे अवैध धंदे बंद करण्याची मागणी शनिपेठ पोलीसांना निवेदनाद्वारे केली. वाल्मीक नगरात सर्रासपणे बेकायदेशीर अवैधरित्या गावठी दारूची व देशीदारूची चोरटी विक्री सुरू असल्याची तक्रार केली आहे. यातून येणार्‍या पैशांतून बिनापरवाना दाम दुप्पट दराने सावकारी व्यवसाय सुरू असल्याचे गर्‍हाणे या महिलांनी पोलिसांसमोर मांडले. या व्याजाची रक्कम वसुल करणे व चोरटी दारू विक्रीसाठी त्यांनी भाडोत्री गुंड ठेवलेले असल्याचे म्हटले आहे. यामुळे परिसरात दररोज हाणमारी होवून सार्वजनिक शांततेचा भंग होत आहे. या भागातील तरूणी व विवाहीत महीलांचे रक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

देशीदारूची खुलेआमपणे विक्री होत असल्याने घरातील पुरूषमंडळी कामधंदा सोडून दररोज सकाळपासून उधारीने दारू पिवून घरात शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी बेदम मारहाण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीसांचे या व्यावसायिकांसोबत लागेबंधे असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप निवेदनात या महिलांनी केला आहे.

पोलीसांनी केली दोघांना अटक: वाल्मीक नगरातील महिलांच्या तक्रारींवरून एपीआय बेंद्रे, एपीआय राजुरकर यांच्यासह 6 जाणांच्या पथकाने आसोदा रोड वरील अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई केली. यात गावठी दारू विक्री करणार्‍या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.