वाल्याची बायको

0

अब्दुल करीम तेलगी देशाच्या अर्थव्यवस्थेलाच आव्हान देणार्‍या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील प्रमुख आरोपी. 18 राज्यांतील 70 शहरांत या माणसाचे 350 एजंट होते. आत्तापर्यंतच्या तपासातून पुढे आलेल्या माहितीनुसार, तीस हजार कोटींहून अधिक रकमेचा अपहार झाला होता. तरीदेखील ही माहिती अपुरीच आहे. कारण एवढा मोठा घोटाळा करणारा तेलगी एकटा नव्हता. अनेक बडे प्रशासकीय अधिकारी, राजकारणी यांची त्याला साथ होती. पण यांपैकी कुणाचेच नाव पुढे येणार नाही याची तपासादरम्यान पुरेशी काळजी घेण्यात आली. तेलगी तर सापडला पण बाकी लाभार्थी नामानिराळे राहिले.

1994 मध्ये तेलगीने इंडियन सेक्युरिटी प्रेस, नाशिकमधील बड्या अधिकार्‍यांच्या साथीने भंगारात पडलेले मुद्रांक छपाई मशीन विकत घेतले. प्रेसच्या पुरवठादारांकडून संगनमत करून छपाईचे विशेष कागद आणि शाई पदरात पाडून घेतली. एका अर्थाने तेलगीने छापलेले हे बनावट स्टॅम्प पेपर अस्सलच होते, पण बेहिशोबी होते. तेलगीने विकलेले हे बनावट स्टॅम्प पेपर आणि रेव्हेन्यू स्टॅम्प, बँका आणि न्यायालयांत होलसेलमध्ये विकले जाऊ लागले. बड्या धेंडांचा वरदहस्त असल्याने हे प्रकरण अगदी 2001 पर्यंत बिनबोभाट चालू राहिले. तेलगी गडगंज संपत्तीचा धनी झाला. शेवटी 2001 मध्ये तेलगी कर्नाटक पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पण महाराष्ट्र पोलिसांनी तपासाचे निमित्त करून त्याला आपल्या ताब्यात घेतले. मात्र, हा तपास विलक्षण होता. 2003 साली जेव्हा विशेष तपासणी पथकाने त्याच्या कुलाबा, मुंबईच्या घरी छापा मारला तेव्हा तो पोलिसांसोबत पार्टी करताना आढळला होता. नार्को टेस्टमध्ये तेलगीने तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांचे नाव घेतले होते. या गहिर्‍या संबंधांमुळेच महाराष्ट्रात पोलीस तेलगीची विशेष बडदास्त ठेवण्यात गुंतले होते.

2007 मध्ये तेलगीने गुन्हा कबूल केला. त्याला 30 वर्षांचा कारावास आणि 202 कोटींचा दंड ठोठावण्यात आला. मालमत्तेवर जप्ती आली. पण अजूनही बरीचशी बेहिशोबी मालमत्ता शिल्लक आहे. तेलगीने त्याच्या पत्नीच्या आणि अन्य नातलगांच्या नावानेही बरीच स्थावर मालमत्ता घेऊन ठेवली आहे. 23 ऑक्टोबरला तेलगीचा मृत्यू झाल्यानंतर आता त्याची पत्नी शाहिदा आता ही मालमत्ता सरकारजमा करू इच्छिते. बनावट मुद्रांक घोटाळ्याच्या पैशातून घेतलेली ही मालमत्ता सीबीआयने फेरतपास करून ताब्यात घ्यावी, असा तिने विशेष न्यायालयात अर्जच केलाय. खरंतर तेलगीने बरीचशी मालमत्ता पत्नीच्याच नावे घेतल्याने, तिचंही या घोटाळ्यात आरोपी म्हणून नाव आहे. तरीही आज इतक्या वर्षांनंतर अचानक तिला अशी उपरती का व्हावी, याचं नेमकं कारण कळायचा मार्ग नाही. खुद्द तेलगीनेच तशी अंतिम इच्छा व्यक्त केली होती, असं तिचं म्हणणं आहे. पण तेलगीची खरंच तशी इच्छा असती तर त्याने जेलमध्ये घालवलेल्या सोळा वर्षांत सगळंच सांगून टाकायला हरकत नव्हती. पडद्यामागचे साथीदार आणि घोटाळ्याचा एकूण आवाका याबद्दल तो बरेच काही सांगू शकला असता. अगदी फार आधी नाही पण अलीकडे अनेक आजारांनी ग्रासल्यावर, मृत्यूच्या दारात तरी त्याला सत्य सांगता आलेच असते. बेहिशेबी संपत्ती सरकारजमा केली नाही, तर अल्ला माफ करणार नाही, असं शाहिदा म्हणते. मग तेलगीला हे भय का वाटले नाही? की परलोकीच्या त्या शिक्षेपेक्षा, इहलोकीच्या कुण्या सूत्रधाराची दहशत जास्त मोठी होती? तेलगीने तपासादरम्यान अनेक बड्या धेंडांची नावे घेऊनही कारवाई झाली नाही. कारण काहीही असो, पण वाल्या कोळ्याच्या या आधुनिक कथेतही त्याच्या बायकोने त्याच्या पापाचे भागीदार होण्याचे नाकारले आहे. नवरा असताना तोंड उघडू शकली नसेल कदाचित, पण तो जाताच तिने हरामाचा माल परत करण्याची तयारी दर्शवली आहे. दुर्दैव फक्त इतकेच की या आधुनिक कथेतल्या वाल्याला मात्र वाल्मीकी व्हायची संधी मिळाली नाही. ज्या घोटाळ्यात त्याने हसत हसत भाग घेतला, त्याच फासात तो पुढे असा अडकला की सत्याचा मार्ग शोधणेही अवघड झाले. 16 वर्षांच्या तुरुंगवासात उपरतीचे अनेक क्षण आले असतील, पण घुसमटण्यापलीकडे काहीच हाती लागले नाही. हजारो कोटींची संपत्ती अशावेळी काहीच कामी येत नाही. सात पिढ्यांची सोय लावण्यात गुंतलेल्यांनी यातून काहीतरी बोध घेतला म्हणजे झाले.

– सृष्टी गुजराथी
मुक्त पत्रकार, लेखिका खारघर, मुंबई
9867298771