वाळूचा अवैधा उपसा करणार्‍यांवर कारवाई

0

जुन्नर । परवानगी घेऊन ठरवून दिलेल्या वाळूच्या साठ्यापेक्षा जास्तीचा वाळू उपसा करणार्‍यांवर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. बोतार्डे येथील शेतकर्‍यांची नदीकाठची जमीन नदीपात्रात गेली आहे. जमिनीचे सपाटीकरण करायचे आहे अशा सबबी पुढे करून मर्यादेपेक्षा जास्त वाळू उपसा करत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे यांनी हे आदेश दिले.

सुराळे, बोतार्डे येथे मीना नदीच्या कडेला खाजगी क्षेत्रात तसेच नदीपात्रात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता. उपशासाठी पोकलेन, बुलडोझर आदी यंत्रणा वापरण्यात येत होती. यासंबधी माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप उत्तर्डे यांनी समाज माध्यमातून या विषयी आवाज उठवला. त्यामुळे महसूल प्रशासनास कारवाई करणे भाग पडले. वाळू व्यावसायिकांकडे अधिकृत परवाना होता. त्यामुळे वाळू उपसा निर्धोकपणे सुरू होता. मात्र, त्यांनतर शासनाने निर्धारीत केलेले क्षेत्र सोडून नदीपात्र तसेच इतर शेतकर्‍यांच्या जागेतील वाळू उपसा सुरू केला होता. तहसीलदारांनी या ठिकाणी भेट देऊन महसूल यंत्रणेला अहवाल देण्यास सांगितले होते. निर्धारित 1000 ब्रासपेक्षा जास्तीचा वाळूउपसा होत असल्याची चर्चा होऊ लागल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाननंतर तहसीलदारांनी या उपशाची ईटीएस यंत्रणेद्वारे पाहणी केली. शेतकर्‍यांच्या जमिनीत वाळू उपशाची परवानगी असताना नदीपात्रात वाळू उपसा होत असल्याचे यावेळी निर्दशनास आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.