शिरपूर । शिरपूर तालुक्यातील उप्परपिंड तापी नदी काठावरील केंद्र क्रं.1 व 2 हा वाळू ठेका गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरलेला आहे. संबंधित ठिकाणी वाळू उपसा करण्याची परवानगी देवू नये अशा आशयाचे निवेदन तब्बल 8 ग्राम पंचायतींनी एकमुखाने ठराव संमत करून सदर निवेदनाची प्रत शुक्रवार 15 रोजी शिरपूर येथील उपविभागीय अधिकार्यांकडे सुपूर्द करण्यात आली. या निवेदनावर असंख्य ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.
नियम, अटींची पायमल्ली
निवेदनात त्यांनी नमुद केले आहे की, उप्परपिंड, वनावल, जातोडे, रूदावली, बाळदे, बोरगाव, हिंगोणी व शिंगावे या गावांच्या लगत असलेल्या तापी नदीतून दरवर्षी लाखो टन बेसुमार व बेकायदेशीरपणे वाळू उपसा केला जात आहे. सदरचा वाळूउपसा हा यापूर्वी परमिटचा आधारे होत होता. मात्र त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी सदर वाळूउपसा हा ठेका पद्धतीने लिलाव देवून गेल्या 6-7 वर्षांपासून हा वाळूउपसा सतत सुरू आहे. वाळू उपसा करतांना शासनाच्या नियम व अटीची पायमल्लीकरून शासकीय अधिकार्यांना हाताशी धरून बेकायदेशीररित्या नियमबाह्य वाळूउपसा झालेला आहे.
वाळु उपश्यामुळे होणारे नुकसान
भुजल पातळीत प्रचंड घट झाली आहे, वाळू उपसा सुरू राहिल्यास नदीचे रूपांतर वाळवंटात होवू शकते, वाळू वाहतूक करणारे चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याने अनेक लहान मोठे अपघात झाल्याचा इतिहास आहे, ठेकेदारांकडून गुंडांचा वापर होत असल्याने नेहमीच दहशत राहत असल्याने ग्रामस्थांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे, वाहनांमुळे वीजेचे तार तुटणे, खांब त ुटणे हे प्रकार होत असल्याने नियमित वीजेची समस्या होत असते. बारमाही वाहणारी तापी नदी वाळू उपश्यामुळे कोरडी पडली आहे. नदीपात्र खोल गेल्यामुळे जमिनीत होणारे सिंचन हे कमी झालेआहे. वाळू ठेकल्याची मुदत संपल्यानंतर देखील वाळू उपसा बरीच महिने चालू राहिल्यामुळे शासनाचे देखील नुकसान होत आहे.
वाळू उपसा लिलाव रद्द करा
निवेदनाच्या शेवटी भविष्यात कधीही वाळू उपसा करण्याची परवानगी देवू नये तसेच वाळू उपसा लिलाव झाला असल्यास तो त्वरीत रद्द करण्यात यावा अन्यथा सर्व ग्रामस्थ उपोषणाचा मार्ग अवलंबतील असा इशारा देखील देण्यात आला आहे. निवेदनासोबत हिंगोणी, बोरगांव, जातोडे, गिधाडे, वनावल, उप्परपिंड, रूदावली, शिंगावे या गावांचे वाळू लिलाव करण्यास प्रतिबंध करणेबाबतच्या ठरावाच्या प्रती जोडल्या आहेत. या निवेदनावर भरत पाटील, मिलिंद पाटील, जितेंद्र पाटील, जगतसिंग राजपूत, निलेश पाटील, मायाबाई पाटील, मनोहर पाटील, मनोहर पाटील, देवेंद्र राजपूत, नानेसिंग राजपूत, पूजा पाटील, रणजित पाटील, शांतीलाल पाटील, नगराजपाटील, चेतन पाटील, उखा पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.
खड्ड्यांत पडुन तीन युवकांनी गमावला जीव
अनेकदा वाळू ठेकेदार यांनी स्थानिक लोकांशी वाद करून त्यांच्या जिवीतास धोका होईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंडागर्दी केली आहे. त्या अनुषंगाने स्थानिक पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल झाले आहेत.बेसुमार वाळू उपसा होत असल्याने तापी नदीची चाळण झाली असून अनेक ठिकाणी 50 ते 60 फुटांपयरत मोठ-मोठे खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये शासनाच्या अधिकृत नोंदीनुसार तीन युवकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच अनेक बेपत्ता देखील झालेले आहेत. यामुळे स्थानिक लोकांनी वाळु उपश्यास विरोध केला असता वाळू ठेकेदार हे भाडोत्रीगुंडांकरवी धारदार शस्त्रांनी व बंदुकी ंनी धाक दाखविण्याचे प्रकार देखील घडलेले आहेत. सदर ठेका रद्द करावा यासाठी अनेकदा शासनदरबारी अर्ज व निवेदने देण्यात आले आहेत. परंतु शासकीय अधिकारी हे सदर अजारना केराची टोपलीदाखवित असल्याचा प्रकार दिसत आहे.