नेरुळ : नवी मुंबई वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह हे गेल्या काही वर्षांपासून कात टाकण्याच्या प्रतीक्षेत होते.मात्र याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस नाट्यगृहाची उपेक्षा होत होती. नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी 2015 साली ही बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत तत्कालीन आयुक्तांबरोबर पाहणी दौरा केला व विकास आराखडा जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भातील सातत्याने पाठपुरावा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व नवी मुंबई मनसे चित्रपट सेनेचे शहर संघटक श्रीकांत माने व त्यांच्या सहकार्यांनी सुरू ठेवत प्रशासनास विकास आराखडा व त्यात होणारी कामे जाहीर करण्यास भाग पाडले.
मनसेने केला होता नाट्यगृहाचा पाहणी दौरा
यादरम्यान टेली क्लाइंबर कोसळण्याची दुर्घटना भावे नाट्यगृहात घडली. त्यावेळी मनसे व मनसे चित्रपत सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत शहर अभियंत्यांच्या दालनात पताका आंदोलन करत तात्काळ डागडुजी करण्याची मागणी केली. शहर अभियंता मोहन डगावकर यांनी मनसेची मागणी लेखी स्वरूपात मान्य करून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे राज्य अध्यक्ष अमेय खोपकर व नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष काळे यांनी मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत भावे नाट्यगृहाचा पाहणी दौरा केला.
नाट्यगृहाने कात टाकली
दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विष्णुदास भावे नाट्यगृहातील ग्रीन रूम, रंगभूषा रूम, तालीम रूम, अग्निशमन साहित्य व इतर छोटे मोठे बदल करत भावे नाट्यगृहाने कात टाकली आहे. यासंदर्भात मनसेने काहीअंशी समाधानी व्यक्त केले.