वासिंद : वासिंदजवळील भातसा उजवा तीर कालव्यावरील चाफ्याचा पाडालगत कालव्याला जोडलेला लोखंडी पुल मंगळवारी सांयकाळी अचानक कोसळला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. परंतु काही शेतकर्यांची 8 गुरे जखमी झाल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे वासिंद ग्रामीण उपविभागप्रमुख राजदीप जामदार व शिवसेनेचे दहागाव शाखाप्रमुख श्याम धानके तसेच रवींद्र वावर व चाफयाचा पाडा व परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.
अन्यथा जीवीतहानी झाली असती…
कालवा ओलांडून वासिंद दहागावकडे जाण्यासाठी जलसंपदा विभागाने भातसा उजव्या तीर कालव्यावर हा लोखंडी 35वर्षांपूर्वी बांधला होता. या पुलाचे काम फार जुने असल्याने पुलाचे काम संपूर्ण जीर्ण होऊन पुल आता कमकुवत झाला होता. या पुलाची देखभाल व दुरुस्ती जलसंपदा विभागान वेळोवेळी न केल्याने परिणामी मोडकळीस आलेला हा लोखंडी पुल अखेर मंगळवारी सांयकाळी कोसळला. या घटनेची माहिती जलसंपदा विभागाचे शहापूरचे उप अभियंता नवनाथ गोराड यांना स्थानिक नागरिकांनी दिली आहे. सुदैवाने या पुलावरुन या वेळेस कुणीही नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी जात नव्हते. अन्यथा या घटनेत मोठी जीवीतहानी झाली असती असे येथील गावकर्यांनी सांगितले.
पूल बांधण्याची मागणी
पुल कोसळल्याने आता वासिंदकडे जाणारा रहदारीचा मार्ग बंद झाल्याने येथील नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होणार आहेत. एकूण 7 किलोमीटर वळसा घालून चाफयाचा पाडा येथील नागरिकांना जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या कालव्यावर तात्काळ शहापूर जलसंपदा विभागाने पुल बांधावे अशी मागणी शिवसेनेचे वासिंद ग्रामीण उपविभाग प्रमुख राजदीप जामदार यांनी केली आहे.