वासुली । गावकामगार तलाठी नसल्याने खेड तालुक्यातील मौजे वासुली येथील तलाठी कार्यालयाला कुलूप लावण्यात आले आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून येथे तलाठ्याची वानवा आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.चाकण एमआयडीसी टप्पा क्र.2 मधील मौजे वासुली येथे स्वतंत्र सजा असून याठिकाणी वासुली, सावरदरी आणि शिंदे या तीन गावांची महसूल संबंधी शेतीची सर्व कामे या गावकामगार तलाठी कार्यालयामार्फत होतात. शेतकर्यांना शेती संबंधी, शासनाच्या विविध योजना, पिक विमा, 7/12 उतारा आदी कामांसाठी तलाठी कार्यालयातील कागदपत्रांची नेहमी गरज असते. तसेच पिक पाहणी, जमिनीचे आपापसातील हक्कासोडपत्र, वाटपपत्र, विविध कार्यकारी सोसायटी व बँकेचे शेतीवरील कर्ज बोजे नोंद, बँकेचे नील दाखले अशा विविध नोंदीसाठी तलाठी कार्यालयात जावे लागते. तसेच हा सर्व औद्योगिक भाग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. त्यामुळे नोंदीविषयक व खरेदी विक्री व्यवहारमुळे निर्माण होणारे वाद, तक्रारी करण्याचे स्थानिक पातळीवरील हे महत्वाचे कार्यालय असल्याने शेतकरी, नागरिक, व्यावसायिक यांची येथे सतत वर्दळ असते. याशिवाय नागरिकांना रेशन कार्ड, स्वस्त धान्य वितरण, उत्पन्न दाखले, विद्यार्थ्यांना विविध दाखले तसेच मतदार नोंदणीसारख्या कामांसाठी तलाठी कार्यालयात जावे लागते.
कामे रखडली
गावकामगार तलाठी नसल्याने सजा वासुली येथील तलाठी कार्यालय गेल्या 3 ते 4 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे शिंदे, वासुली, सावरदरी येथील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व व्यावसायिक यांचे मोठे हाल होत आहेत. कर्ज प्रकरणे, कर्ज बोजा नोंदी, खरेदी-विक्रीच्या नोंदी रखडल्या आहेत. नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेवून खेड तालुका तहसीलदार सुनील जोशी यांनी आंबेठाण, महाळुंगे येथील तलाठ्यांकडे वरील तिन्ही गावांचा अधिक भर दिला गेला होता. सध्या वराळे येथील गावकामगार तलाठी कोठावळे यांच्याकडे अधिकची ही तिन्ही गावे देण्यात आली आहे. परंतु नागरिकांची सगळी कामे होत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ वैतागलेले आहेत.
तलाठ्यांची संख्या अपुरी
एका तलाठ्याकडे अधिकची गावे दिल्याने कामे वेळेवर होत नाहीत. मुख्य सजातील गावाच्या कामाचा आधीच ताण असतो अशा परीस्थित अधिकच्या गावातील नागरिकांची कामे वेळेवर करून देण्यास संबधित तलाठी हतबल असल्याचे काही तलाठ्यांनी खाजगीत बोलताना सांगितले. सदर गावातील नागरिकांनी आजवर जेवढी गैरसोय झाली ती झाली. आता तरी स्वतंत्र गावकामगार तलाठ्याची नेमणूक करावी, अशी मागणी तालुका महसूल प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंबंधी खेडच्या तहसीलदारांकडे संपर्क साधला असता, तालुक्यात गावकामगार तलाठी संख्या अपुरी असल्याचे त्यांनी सांगितले. यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयाला सविस्तर माहिती देण्यात आली असून पुढील काही दिवसात यासंबंधी कार्यवाही होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.