शहरात वाहतुकीवरील कारवाईची मोहीम जोमात सुरु झाली
बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाई सध्या थंडावली
पिंपरी : वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहन चालकांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी 79 लाख 13 हजार 600 रुपयांचा दंड केला आहे. यामुळे शहरात वाहतुकीचे नियम मोडणार्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तरीही शहरात काही ठिकाणी नो पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे तसेच वेगात वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांना सर्रासपणे तिलांजली दिली जात आहे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान सुरु झालेली वाहतूक कारवाईची मोहीम दिवसेंदिवस ढिसाळ होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर देखील सध्या बेशिस्त वाहतुकीचे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसत आहे.
उल्लंघन करणार्यांना दंड
शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारावी, नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शहरात येताच शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा केली. त्यासाठी विविध उपाय योजना सुरु केल्या. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊ लागली. तसेच सार्वजनिक रस्त्यांवर बेदरकारपणे वाहन चालविणार्यांवर भारतीय दंड संहिता कलम 279 अन्वये गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहेत. जानेवारी ते सप्टेंबर 2018 या दहा महिन्यात 54 हजार 3 गुन्हे दाखल जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यातील काही जणांवर खटले देखील दाखल करण्यात आले आहेत. मागील दहा महिन्यांमध्ये 228 जणांवार रॅश ड्रायव्हींगचे खटले दाखल करण्यात आले आहेत.
कारवाईचे चित्र विरळ
शहरात ठिकठिकाणी रिक्षाचालक जाणीवपूर्वक रस्ता अडवून ठेवतात. त्यामुळे सिग्नलवरील वाहनांना अडथळा निर्माण होतो. याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होतो. अशा बेशिस्त वाहनांना जॅमर लावून कारवाई केल्याचे चित्र मागील दोन महिनांपुर्वी दिसत होते. मात्र सध्या हे चित्र विरळ झाले आहे. ट्रिपल सीट बसून जाणे, सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे हे प्रकार काही प्रमाणात का होईना अजूनही होतच आहेत. त्यामुळे वाहतुकीची शिस्त पाळणार्या वाहन चालकांना याचा मोठा त्रास होत आहे. वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन जाधव म्हणाले की, कारवाईची मोहीम थंडावलेली नाही. कारवाई करणे सुरूच आहे. शहरात वाहतुकीची समस्या पूर्वी फार बिकट होती. त्यात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. वाहतूक पोलिसांच्या नजरा चुकवून काही वाहन चालक नियमांचे उल्लंघन करीत असतील. पण त्यांच्यावर देखील वाहतूक पोलिसांची करडी नजर आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी वाहतूक विभाग प्रयत्नशील आहे.