वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर कारवाई

0

येरवडा वाहतूक विभागाची मोहीम

येरवडा : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर येरवडा वाहतूक विभागाने धडक कारवाई मोहीम उघडली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक जयवंतराव जाधव यांनी दिली. विश्रांतवाडी वाहतूक नियंत्रण कक्षांतर्गत असलेल्या येरवडा, रामवाडी, सादलबाबा दर्गा, शास्त्रीनगर, कल्याणीनगर, नागपूर चाळ आदी भागाचा येरवडा वाहतूक विभागाच्या कक्षात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येरवडा वाहतूक कक्षाचे कामकाज मोठ्या प्रमाणात वाढले असून संबंधित कारवाई पोलीस उपायुक्त तेजश्री सातपूर, सहाय्यक पोलीस आयुक्त देविदास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दुपारी थकबाकी वसुली

सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात येत आहे. ज्या वाहनचालक अथवा दुचाकीस्वाराने नो पार्किंगमध्ये वाहने लावली असतील त्या वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जर एखाद्या चालकाने पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला तर अशा वाहनचालकांच्या वाहनांना जॅमर लावण्यात येते. सकाळच्या सुमारास वाहतुकीचे नियम मोडणार्‍या चालकांवर कारवाई करण्यात येते. दुपारी 3 ते संध्याकाळी 6 दरम्यान ज्या चालकांनी यापूर्वी मोडलेल्या वाहतुकीच्या नियमांचा
दंड भरलेला नाही, अशा वाहनावर कारवाई करण्यात येते. तर संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत जे चालक दारू पिऊन वाहने चालवत असतील त्या तळीरामांवर कारवाई करण्यात येते.

दिवसाला 50 हजारांचा दंड वसूल

दररोज कमीत कमी 50 हजाराहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे. दिवस रात्र कारवाई सुरूअसल्यामुळे वाहनचालकही धास्तावले आहेत. चालकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, या दृष्टीकोनातून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. भविष्यात देखील वाहतुकीचे नियम मोडणार्‍या व दारू पिऊन वाहन चालविणार्‍या चालकांवर कडक कारवाई मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली.