स्थानिक नागरिकांमुळेच अतिक्रमणात वाढ; हप्ते वसुलीचे प्रकार वाढले, भीमशक्ती संघटनेचा आंदोलनाच्या इशारा
येरवडा । येरवडा-विश्रांतवाडी मार्गावरील कॉमर झोन चौकात नेहमीच वाहनचालकांना वाहतूककोंडीला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येवर पालिकेने सुसज्ज रस्ताही उभारला मात्र अनेक वाहनचालक, खासगी कंपन्यांच्या बसेस पार्क करण्यासाठी भारत पेट्रोल पंप रस्त्याचा वापर वाहनतळ म्हणून करत आहेत. त्यातच भर म्हणजे अनेक व्यावसायिकांनी रस्त्याचा अनधिकृत ताबा घेतल्याने वाहतूक समस्या वाढली आहे. रस्ता सरकारचा पण स्थानिक नागरिक महिन्याला आठ ते नऊ हजार रुपये हप्ता म्हणून उकळत असून या मार्गावर रस्त्यालगत जवळपास ५०च्यावर व्यावसायिकांनी अनधिकृत शेड उभारले आहेत.
दररोज ३०० रुपयांची कमाई
याबरोबरच अनेक व्यावसायिकांनी खासगी कंपनी ते मनोरुग्णालयापर्यंत रस्त्यावर अनधिकृत ताबा घेतल्याने वाहतूककोंडीत अधिक भर पडल्याचे चित्र पाहायला मिळते. अनेक व्यावसायिकांकडून स्थानिक नागरिक दररोज ३०० रुपये याप्रमाणे हप्ता वसुली म्हणून कमाई करत आहेत. एका दुकानांमागे स्थानिक नागरिक महिन्याला ९ हजार रुपये फुकटची कमाई होत आहे. या मार्गावर जवळपास पन्नासच्यावर व्यावसायिकांनी अनधिकृत शेड रस्त्यालगत उभारले आहेत. त्यामुळे हप्ते वसूल करणारे स्थानिक नागरिक व अधिकारी यांच्यात काही अर्थपूर्ण चर्चा होते की काय? अशी शंका भालेराव यांनी व्यक्त केली आहे.
वाहनतळासाठी रस्त्याचा वापर
या परिस्थितीतून वाहनचालकांची सुटका होणार का? असा संतप्त सवाल भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष अरुण भालेराव यांनी केला असून त्वरित उपाययोजना न केल्यास संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा भालेराव यांनी दिला आहे. येरवडा भागातून विश्रांतवाडी भागाकडे मार्ग जात असून या मार्गावरच येरवडा कारागृह व शासकीय मनोरुग्णालय असल्याने या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावर वाहनचालकांना नेहमीच वाहतूककोंडीला सामोरे जाण्याची वेळ येत असताना त्यात आणखी भर पडली आहे. ती खासगी कंपन्यांची त्यातच या मार्गावरील वाहतूककोंडी सुरळीत व्हावी या उद्देशाने पालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून अग्रेसन शाळा ते टिंगरेनगर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते.
मात्र सत्ताधारी पक्षाकडून राजकीय पोळी भाजून घेण्याच्या उद्देशाने मागील महिन्यातच मोठ्या थाटामाटात मनोरुग्णालय ते भारत पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले असले तरी या रस्त्याचा वापर अनेक वाहनचालक वाहनतळासाठी करत आहेत. या मार्गावर समाज कल्याण कार्यालयाचे वसतिगृह ते भीमनगरपर्यंत दुचाकीसह चारचाकी वाहने लागल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते. त्यामुळे रस्ता नक्की कोणाचा असा प्रश्न या मार्गावरून जाणार्या वाहनचालकांना पडत आहे.
अतिक्रमणांमुळे केलेला खर्च पाण्यात
विशेष म्हणजे भालेराव यांनी वाहतूक नियंत्रण कक्ष व खासगी कंपनीचे व्यवस्थापक संतोष घोलप यांना वाहतूककोंडीची माहिती दिल्यावर घोलप यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचा आरोप भालेराव यांनी केला आहे. यामुळे रस्त्याच्या विकासकामासाठी पालिकेच्या वतीने जरी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असले तरी पण रस्त्यालगत लावलेली वाहने व अनधिकृत उभारलेल्या व्यावसायिक शेडमुळे केलेला खर्च पाण्यातच गेला असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
नागरिकांनाच नाहक त्रास
अनेक संघटना व राजकीय पक्षाच्या वतीने या मार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी. या उद्देशाने येरवडा वाहतूक नियंत्रण कक्षाला निवेदन देऊन ही पोलीस अधिकार्यांनी अशा निवेदनांना केराची टोपलीच दाखविल्याचे यावरून सिद्ध होत आहे. जनतेच्या मिळणार्या करातूनच अनेक विकासकामे मार्गी लागली जात असताना त्या नागरिकांनाच वाहतूककोंडीचा सामना करण्याची वेळ येत असेल तर त्यांनी दाद कोणाकडे मागायची असा सवाल भालेराव यांनी केला असून या मार्गावरील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी न लागल्यास भीमशक्ती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.