वाहतूकदार संपाने भडकणार महागाई

0

नवी दिल्ली । देशावर पुन्हा एकदा महागाईचे संकट उभे राहणार आहे. कारण डिझेलच्या वाढत्या किमतीविरोधात वाहतूकदारांनी आजपासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात देशभरातील 60 टक्के ट्रकचालक सहभागी झाले आहेत. ’सरकारचे इंधन दरवाढीवर नियंत्रण राहिले नाही. आंतरराष्ट्रीयस्तरावर दरवाढ झाल्याने इंधन दरवाढ करण्यात आल्याचे कारण सरकार देत आहे. पण केंद्र सरकार आणि राज्य सरकाराच्या करांमुळे ही दरवाढ झाल्याचे आमचे मत आहे’, असे ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ गुड्स व्हेइकल्स ऑनर्स असोसिएशनचे अध्यक्ष चन्ना रेड्डी यांनी सांगितले.

संपात 90 लाख ट्रकचालक उतरल्याचा दावा
आजच्या संपात 90 लाख ट्रकचालक उतरले असल्याचेही ते म्हणाले, तर पश्‍चिम बंगालमध्ये 3.5 लाख ट्रकचालक संपात सहभागी झाल्याचा दावा बंगाल ट्रक ऑपरेटर असोसिएशनचे संयुक्त सचिव सजल घोष यांनी केला. केंद्र सरकार एक लीटर इंधनामागे आठ रुपये अधिभार आकारते. राज्याकडूनही 10.30 रु. अधिभार आकारला जातो, एक कि.मी. रस्त्यासाठी सरकार आठ रुपये कर घेते. थर्ड पार्टी विमादरातील वाढीसह टोलचाही भार सोसावा लागत असल्याने मालवाहतूकदारांमध्ये नाराजी आहे. त्यातूनच संप पुकारला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.