वाहतूकीच्या मार्गालगतच कचर्‍याचे ढीग ; स्वच्छता अभियानाचा बोजवारा

0

पालिकेच्या बेफिकीरीने संताप ; दुर्गंधीच्या त्रासाने वाहनधारक व पादचारी त्रस्त

भुसावळ- नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात स्वच्छता अभियान राबवल्याने पालिकेला पारीतोषीक देवून गौरवण्यात आले मात्र पारीतोषिक मिळताच पालिकेने शहरातील स्वच्छतेकडे कानाडोळा करण्यास सुरूवात केली आहे यामुळे शहराच्या मुख्य भागासह विविध भागात केरकचर्‍याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. पालिका प्रशासनाने या संदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अस्वच्छतेच्या ठपक्यानंतर फास्टेट मुव्हर्स पुरस्कार
अस्वच्छतेच्या बाबतीत देशात दुसरा क्रमांक नगरपालिकेचा आल्यानंतर पालिका प्रशासनासह सत्ताधार्‍यांनी कंबर असू शहरातील घंटागाडी तसेच कचराकुंड्यांची व्यवस्था करून विविध सुधारणा केल्या तर या अभियानाची दखल घेवून नगरपालिकेला स्वच्छता अभियानात पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे. पारीतोषीकामूळे पालिका प्रशासन पदाधिकारी व शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पारीतोषीक मिळताच शहरवासीयांच्या आनंदावर विरजण पडत असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या विविध भागातील रस्त्यांलगत केरकचरा साचलेला दिसून येत आहे. बसस्थानक रोडवरील अमर स्टोअर्सलगतच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात केरकचरा साचून पडलेला असल्याने येणार्‍या जाणार्‍या वाहनधारकांना व पादचार्‍यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
शहरातील काही कचरा ट्रॅक्टरद्वारे शहराच्या बाहेर नेवून टाकला जातो मात्र ट्रॅक्टर ओव्हरफ्लो भरून नेले जात असल्याने ट्रॅक्टरमधील कचरा गतिरोधकाच्या दणक्यामुळे रस्त्यावर पडत असतो. याचाही परीसरातील व्यावसायीकांना त्रास सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

सिंधी कॉलनीतही अस्वच्छता
शहरातील व्यापारी लोकांची वसाहत म्हणून ओळख असलेल्या सिंधी कॉलनीच्या श्री संत झुलेलाल महाराज प्रवेशद्वारालगत सांडपाण्याच्या गटारीची स्वच्छता झालेली नाही. परीणामी गटार सांडपाण्याने तुंबल्याने पाणी रस्त्यावर पसरत आहे. याचा परीसरातील रहीवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडेही पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

केवळ स्वच्छतेचा संदेश
पालिका प्रशासनाकडून शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्याचा शहरवासीयांना संदेश दिला जात आहे मात्र पालिकेकडून केवळ संदेश दिला जात असून उपाय योजनांना प्राधान्य दिले जात नसल्याचे शहरवासीयांमध्ये ओरड वाढू लागली आहे.

प्लॅस्टीक व थर्माकोल रस्त्यावर
शासनाने प्रदूषण टाळण्यासाठी प्लॅस्टीक व थर्माकोलच्या वापरावर बंदी घातली आहे.इतकेच नव्हे तर वापर करणार्‍यांवर आणि विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईलाही सुरूवात केली आहे. परीणामी दंडात्मक कारवाईने व्यावसायीकांनी आपल्या दुकानातील प्लॅस्टीक व थर्माकोल रस्त्यावर आणून फेकण्यास सुरूवात केली आहे. याकडे पालिकेने लक्ष देवून कारवाई करण्याची मागणी होत आहे.