व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागचं सत्य अद्याप अस्पष्ट
पिंपरी-चिंचवड : भूमकर चौकाजवळ एक वाहतूक पोलीस एका टेम्पो चालकाला बेदम मारत असल्याचा व्हिडिओ रविवारी दिवसभर सोशल मीडियावर फिरत होता. त्यावर विविध प्रतिक्रिया किंवा चर्चा ऐकायला मिळत आहेत. मात्र, या व्हिडिओ मागील नेमके सत्य अद्याप स्पष्ट झाले नसून त्यावर लवकरात लवकर तपास करण्यात येईल, असे स्पष्टीकरण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिले.
भूमकर चौकातील घटना
भूमकर चौक सतत वाहतुकीसाठी गजबजलेला आहे. त्यामुळे इथे वारंवार कोणत्या ना कोणत्या घटना घडतच असतात. सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेल्या विडिओमध्ये एमएच 12, एफ डी 6795 हा टेम्पो उभा आहे. टेम्पो चालकला एक वाहतूक पोलीस हाताने बेदम मारहाण करीत आहे. हा व्हिडिओ रस्त्याने जाणार्या एका वाटसरूने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्यावरून सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. वर्दीची ताकद, पोलिसी खाक्या, अशोभनीय, निंदनीय, कदाचित पैशांची मागणी पूर्ण केली नसणार म्हणून मारहाण करण्यात येत आहे. अशा एक ना अनेक चर्चा सध्या सुरू आहेत.
या प्रकरणाची लवकरच चौकशी करण्यात येईल. नेमका प्रकार काय आहे हे तपासणे महत्वाचे आहे. ज्याची चूक असेल त्याला शिक्षा नक्की होणार. नागरिकांनी नको त्या चर्चा सोशल मीडियावर पसरवू नये. व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी तसेच व्हिडिओ संपल्यानंतर नेमका काय प्रकार झाला आहे, हे देखील तपासण्यात येईल.
-पोलीस उपायुक्त गणेश शिंदे