वाहतूक पोलिसांची विशिष्ट ठिकाणीच कारवाई

0

नवी मुंबई । कोपरखैरणे परिसरात रस्त्या लगत नियाबाह्य उभी असणार्‍या वाहनावर वाहतूक पोलीस कारवाई करतात. परंतु विशिष्ट ठिकाणीच ही कारवाई होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. वाहने उचलताना नियमाला धरून वाहनावर कारवाई होत नसल्याने कोपरखैरणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांचाच्या हद्दीत कोपरखैरणे व घणसोली नोड आदी परिसर येतो. या ठिकाणातील रस्त्या लगत विविध प्रकारची वाहने नो पार्किंग झोन मध्ये उभी असतात. त्यावर टोइंग व्हॅन द्वारे कारवाई करण्यात येते. परंतु ही कारवाई फक्त रुग्णालये, दुकाने, महापालिका कार्यालय, हॉटेल तसेच इतर ठिकाणी आसणार्‍याच ठिकाणी केली जात आहे. त्यामुळे साहित्य खरेदी, हॉटेलमध्ये जेवन करणे त्याच बरोबर एखाद्या दवाखान्यात रुग्ण नेल्यानंतर वाहन कुठे उभे करायचे असा प्रश्न नागरिकांना पडला असल्याचे रवींद्र राजीवडे यांनी सांगितले. परंतु दारूचे दुकान, बार, मोठे मॉल, अनेक कंपन्यांच्या लागणार्‍या बसेस यावर मात्र कारवाई होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी
या ठिकाणातील वाहने उचलताना पोलिसांचा हात का कापतो, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कोपरखैरणे पोलिसांना काही दिवसांपूर्वीच रस्त्यालगत वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात होतो म्हणून शासनाने एका टोइंग व्हॅनची व्यवस्था करून दिली आहे. व्हॅनद्वारे वाहने उचलताना प्रथमतः सायरन वाजवणे नियमाला धरून असताना वाहतूक पोलीस अश्या प्रकारचे काहीही करत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे, अशी मागणीही रवींद्र राजीवडे यांनी केली आहे.

घणसोली रेल्वेस्थानकासमोरील हॉटेल, बार तसेच इतर मोठ्या दुकानासमोर बस थांबा आहे. हा थांबा येथे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांमुळे पूर्णपणे गिळंकृत केल्याचे दिसत आहे. सेक्टर सात मधील डी मार्ट समोर सुद्धा हीच परिस्थिती दिसून येते. कोपरखैरणे येथील बार तसेच डी मार्ट समोर तर नियमबाह्य वाहणे बिनधास्तपणे उभी असतात. या वाहनांवर चुकूनही कारवाई होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.