वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप तक्रार क्रमांकाचा उडाला बोजवारा; तक्रारदार नाराज

0

पुणे । वाहतूक पोलिस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद असावा आणि त्यांना त्यांच्या तक्रारी तात्काळ देता याव्यात, यासाठी वाहतूक पोलिसांनी तक्रारीसाठी व्हॉट्सअप क्रमांक जाहीर केला आहे. मात्र, तक्रार दिल्यानंतर त्याची तातडीने कोणतीही दखल घेतली जात नसल्याने तक्रारदार नाराज आहेत. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिस यासाठी इ मेल, ट्विटर, फेसबूक, व्हॉट्सअप अशा विविध माध्यमांचा वापर करीत आहे. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आणि तत्पर कार्यवाहीसाठी व्हॉट्सअपचा तक्रार क्रमांक (8411800100) जाहीर केला आहे. या क्रमांकाचा नागरिकांनी वापर करावा यासाठी आपल्या ट्विवटर हँडलवरून याचे मोठ्या प्रमाणात ब्रॅण्डींग आणि प्रमोशन देखील करण्यात येत आहे.

ट्विटरवर तक्रारी
व्हॉट्सअप क्रमांकावर दिलेल्या तक्रारीवर वाहतूक पोलिसांचा प्रतिसाद मिळत नसल्याची ओरड नागरिक करू लागले आहेत. वारंवार मेसेज केल्यानंतर तक्रारीच्या तिसर्‍या किंवा चौथ्या दिवशी आम्ही तुमचा संदेश अमुक वाहतूक पोलिस डिव्हिजनपर्यंत पोहोचवला आहे. एवढेच उत्तर येते. मात्र, कार्यवाही झाली का नाही. संबंधित व्यक्तीला दंड देण्यात आलाय का नाही याबाबत नागरिकांना काहीही समजत नाही, अशा आशयाचे ट्विट तक्रारदारांनी पुणे पोलिसांच्या ट्विटर हँडलवर केले आहे.

पोलिसांचे मौन
पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर चर्चा रंगल्या आहेत. तरीही यावर वाहतूक पोलिस किंवा पुणे पोलिसांकडून मौनच बाळगण्यात येते. किंवा तुमची तक्रार अमुक डिव्हिजनपर्यंत पोहचवण्यात आली आहे, एवढेच उत्तर देण्यात येते, असा निराशाजनक सूर तक्रारदारांनी आवळला आहे. त्यामुळे पोलिससांनी योजनांचे केवळ ब्रँडिंग आणि प्रमोशन करण्यावरच भर दिल्याचे दिसते. प्रत्यक्ष कार्यवाही मात्र वन वे ट्रॅफिक जामप्रमाणे सुरू असल्याचे दिसून येते.

त्वरित उत्तर देण्याचे प्रयत्न करणार!
सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असणार्‍या माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा म्हणाले, त्यांनी केलेल्या तक्रारीवर आतापर्यंत केवळ एकदाच तातडीने कार्यवाही करण्यात आली. वाहतूक पोलिस परदेशी यांनी स्वतःच नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केली होती. याबाबतची तक्रार दिल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात आली. मात्र, अन्य कोणत्याही तक्रारीची साधी दखलही घेण्यात आलेली नाही. या सर्वांबाबत वाहतूक पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले की, आम्ही आमच्या परीने सगळ्या तक्रारींचे संपूर्ण निवारण करण्याचा प्रयत्न करतो. तरीही शंभर टक्के काम होत नसेल तर संवादात कुठे कमतरता आहे याची आम्ही लवकरच तपासणी करून प्रत्येक तक्रारदाराला लवकरात लवकर प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी पुढे सांगितले.