वाहतूक प्रणालीसाठी एमएमआरडीएचा पुढाकार

0

मुंबई । एकात्मिक बस वाहतूक प्रणाली अर्थात इंटिग्रेटेड सिस्टिम फॉर बस ट्रान्सपोर्ट उपक्रम राबवण्यासाठी सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी संबंधित संस्थांकडून एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत. मेट्रो यार्ड, बस डेपो, वडाळा विकास परिसर या भागातून आयएसबीटी प्रणाली राबवता येईल का, त्याची रचना कशी असावी, टेक्नो-इकोनॉमिक आणि फायनान्शियल सुसाध्यता अभ्यास तसेच या इंटिग्रेडेट ट्रान्सपोर्ट सिस्टिमचे व्यवस्थापन याबाबतचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निविदा मागवल्या आहेत. यासाठी 9 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, या प्रकल्पाच्या निविदा 5 फेब्रुवारीपर्यंत दाखल कराव्यात, असेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.

मेट्रो, मोनोला बस वाहतूक जोडणार
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून महानगर प्रदेशाबरोबरच दक्षिण मुंबईतील वडाळा विभागातही एमएमआरडीएच्या भूखंडावर काम सुरू आहे. जवळच मोनोरेलचे स्थानक तसेच मेट्रोचे यार्ड असल्याने या भागात वाहतुकीसाठी बसचे जाळे विस्तारण्यासाठी एमएमआरडीएकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातही एमएमआरडीएने विशेष प्राधिकरण म्हणून अनेक उपक्रम राबवले आहेत. ऑनलाइन पार्किंग तसेच बस वाहतुकीचे पर्याय येथे काम करणार्‍या नोकरदार वर्गासाठी उपलब्ध करून दिले आहे. काही महिन्यांपूर्वीच टाटाच्या मदतीने इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात आली आहे.