धुळे । धुळे शहर वाहतुक शाखेने गेल्या तीन महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनधारकांवर धडाकेबाज कारवाई करीत यंदा रेकॉड ब्रेक वसुली केली. 2017 मधील जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यात सुमारे 8 हजार 77 केसेसे करुन तब्बल 31 लाख 74 हजार 800 रुपयांची वसुली केली आहे. पोलीस अधीक्षक चैतन्या एस. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या आदेशांचे वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक देवरे व त्यांच्या टिमने कायद्याचे काटेकोर पालन करतांना रेकॉड ब्रेक वसुलीचा उच्चांक गाठून एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. कुणाच्याही दबावाला न जुमानता, न घाबरता देवरे यांनी ही धडक कारवाई सुरुच ठेवल्याने त्यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. दरम्यान, जळगाव, नंदुरबार, नाशिक व नगर या नाशिक परिक्षेत्रात सर्वात मोठी कारवाई व दंड वसुली धुळे शहर वाहतुक शाखेने केल्याने पोलीस महासंचालक, नाशिक आयजी व चैतन्या एस. यांनी पोलीस निरिक्षक अशोक देवरे यांचे कौतूक केले आहे.
वाहतुक शाखेचा एक नवीन दबदबा
यापूर्वी वाहतुक पोलिसांनी वाहन पकडल्यास राजकीय दबाव अथवा अन्य दबावाला बळी पडून वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांना सोडून देण्यात येत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, पोलीस निरीक्षक अशोक देवरे यांच्या नेमणुकीनंतर वाहतुक शाखेचा कारभार चांगलाच सुधारला. वाहतुक शाखेचा एक नवीन दबदबा निर्माण करण्यात देवरे यांना यश आले. त्यांनी पकडलेले वाहन कायदेशीर कारवाई झाल्यानंतरच सुटत होते. काही वाहनांना थेट कोर्टात पाठवून दंड वसुल करण्यात येतो. निरीक्षक देवरे हे कुणाच्याही दबावाला जुमानत नाहीत. कुणाही राजकीय अथवा सामाजिक पुढार्याचा फोनही ते घेत नाहीत, असे सर्वश्रृत आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक मुकाट्याने कायदेशीर कारवाईला समोरे जाण्याचे अनेक किस्से घडले आहे.
41 जणांकडुन जागेवरच दंड आकारणी
पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांच्या नेतृत्वात निरीक्षक अशोक देवरे व त्यांच्या सहकार्यांनी सन 2017 च्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यात शहरातील विविध मार्गांवर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्या एकूण 8 हजार 77 वाहनांवर केसेस करण्यात आल्या आहेत. जवळपास 25 प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांचा यात समावेश आहे. या कारवाईतून जानेवारी महिन्यात 9 लाख 78 हजार 900 रुपये, फेब्रुवारी महिन्यात 12 लाख 96 हजार 800 रुपये आणि मार्च महिन्यात 8 लाख 99 हजार 100 रुपये अशी एकुण 13 लाख 76 हजार 800 रुपयांची दंड वसुली करण्यात वाहतुक पोलिसांना यश आले आहे. तसेच यातील 239 केसेस कोर्टात पाठवून वाहन धारकांकडून दंड वसुल करण्यात आला आहे. पुन्हा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 604 केसेस करण्यात आल्या आहेत. 41 जणांकडुन जागेवरच दंड आकारणी झाली असून 64 केसेस कोर्टात पाठविण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे वाहतुक शाखेने अवघ्या तीन महिन्यात रेकॉर्ड ब्रेक वसुलीचा उच्चांक गाठला आहे.
मोबाईल धारकांवरही कारवाई
सध्या सर्वाधिक अपघात वाहन चालवितांना संभाषण करतांना होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. त्याअनुषंगाने वाहतुक शाखेने विविध 25 प्रकारच्या वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन धारकांवर ही कारवाई केली आहे. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे वाहन चालवितांना मोबाईलवर संभाषण करणे कलम 250/177 अन्वये 335 केसेसे तर म्युझिकल किंवा प्रेशर हॉर्न वाजविणे कलम 231(1)/177 अन्वये 12 केसेस करण्यात आल्या आहेत. मोबाईल संभाषण व प्रेशर हॉर्न वाजविणे या केसेसमध्ये अजून वाढ व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून होत आहे.