वाहनचोरीच्या पाच गुन्ह्यांची उकल; गुन्हे शाखेची कामगिरी

0

पिंपरी चिंचवड : गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोन दुचाकी चोरांना अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील दोन, तळेगाव पोलीस ठाण्यातील दोन आणि दिघी पोलीस ठाण्यातील एक वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. विकी दत्ता वाघमारे (वय 22, धानोरी रोड, विश्रांतवाडी), सागर सचिन सातपुते  (वय 19, रा. विठ्ठलवाडी, सिंहगड रोड, पुणे) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.

पाठलाग करून घेतले ताब्यात…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पथक गुरुवारी विठ्ठलनगर पिंपरी येथे हनुमंतराव भोसले हॉस्पिटल समोर थांबले असता नंबर नसलेल्या दुचाकीवरून विकी वेगात गेला. पोलिसांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याजवळ असलेली मोटार सायकल चोरीची असून त्याने याव्यतिरिक्त आणखी तीन मोटार सायकल चोरी केल्या असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी त्याच्याकडून एक बुलेट, एक होंडा युनिकोर्न, एक स्प्लेंडर आणि एक सीडी डिलक्स अशा चार मोटार सायकल जप्त केल्या. तसेच चिंचवड स्टेशन परिसरातून सागर याला ताब्यात घेतले. त्याने दोन मोटार सायकल चोरी केल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याकडून एक पॅशन प्लस, एक स्प्लेंडर प्लस या दोन दुचाकी जप्त केल्या. यामुळे तळेगाव पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

यांच्या पथकाने केली कारवाई…

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस उत्तम तांगडे, युनिट दोनचे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस हवालदार अजय भोसले, प्रमोद वेताळ, राजू केदारी, पोलीस नाईक अमित गायकवाड, सावन राठोड, निशांत काळे, शरीफ मुलाणी, सुनील चौधरी, स्वप्नील शिंदे, विशाल भोईर, सागर शेडगे, गणेश कोकणे यांच्या पथकाने केली.