मोशी – तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी देहूकडे निघालेल्या दोन वारकरी महिलांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवारी) पहाटे मोशी येथे घडली. जनाबाई अनंता साबळे (वय 55) आणि सुमनबाई वैजनाथ इंगोले (वय 60, दोघी रा. अंबाजोगाई, जि. बीड) अशी वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. राज्यभरातून दिंड्या देहू गावाकडे येत आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई मधून एक दिंडी देहूकडे येत होती. याच दिंडीत जनाबाई आणि सुमनबाई आल्या होत्या. मोशी मधील बोर्हाडेवस्ती येथे मंगळवारी (दि. 3) रात्री ही दिंडी मुक्कामाला थांबली. आज पहाटे या दोघी प्रार्तःविधीसाठी जात होत्या. त्यावेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.