250 मिटरचे ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नसल्याने घेतला निर्णय
बारामती । बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालात वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची तपासणी 1 नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली आहे. वाहनांची तपासणी करण्यासाठी 250 मिटरचे ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नसल्याने, ही तपासणी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन धारकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
न्यायालयाने दिलेली अंतरिम मुदत वाढ संपल्याने परिवहन आयुक्त कार्यालयाने जेथे-जेथे ब्रेक टेस्ट घेण्याचे ट्रॅक उपलब्ध आहेत. त्या-त्या ट्रॅकवर वाहने नेऊन योग्यता प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या आदेशामध्ये पुणे, बारामती, कोल्हापूर, कराड, सांगली या आरटीओ कार्यालयातील वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासाठी आरटीओ पिंपरी-चिंचवड येथे नेऊन तेथे वाहनांची तपासणी करावयाची आहेत. त्यासाठी प्रत्येक वाहन मालकास बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामधून पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात वाहनांची तपासणी करण्यासाठी एनओसी काढावी लागणार आहे. त्यानंतरच वाहन आरटीओ पिंपरी-चिंचवडला घेऊन जाता येणार आहे.
योग्यता प्रमाण पत्र मिळण्यास अडचणी
बारामती आरटीओकडून एनओसी घेऊन गेल्यावर आरटीओ पिपरी-चिंचवड येथे वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राच्या तपासणीचे शासकीय शुल्क भरावे लागणार आहे. वाहनाची नोंद आरटीओ बारामती येथे असल्याने शासनाने ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देऊनदेखील त्या वाहनाचे शासकीय शुल्क मॅन्युली भरावे लागणार आहे. त्यामुळे वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राची तपासणी करूनदेखील योग्यता प्रमाण पत्र (फिटनेस) मिळण्यास अडचणी येणार आहेत.
वाहनचालकांमध्ये गोंधळ
पिंपरी-चिंचवड येथे वाहने नेऊन पासींग योग्यता प्रमाणपत्रांची तपासणी होईल, याची कसलीही शाश्वती नाही. कारण बारामती आरटीओमधून एनओसी काढल्यानंतर वाहन तपासणीसाठी आरटीओ पिपरी-चिंचवड येथे घेऊन गेले असता न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एक मोटार वाहन निरीक्षक फक्त 30 वाहनांची तपासणी करू शकतात. एका दिवसात न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार दिवसभरात जास्तीत जास्त 50 वाहनांचीच तपासणी होऊ शकते. त्यामुळे बारामती आरटीओमधून वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासाठी परवानगी एनओसी काढूनसुद्धा वाहने पासींग होतील, याची गॅरंटी नसल्याने वाहनचालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.