वाहनांवरील दादा, मामा, भाऊचा नंबर कायम!

0

भुसावळ। स्पेशल नंबरवाल्या गाडीमुळे आपणही स्पेशल व्यक्ती असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न या लोकांकडून सातत्याने होतो. स्पेशल नंबर आणि तेही शब्दांच्या स्वरूपात गाड्यांचे नंबर प्लेटवर टाकून फिरणार्‍या वाहनधारकांविरुद्ध वाहतूक पोलीसही कारवाई करण्यास धजावत नसल्याचे चित्र शहरात दिसून येते. स्पेशल नंबर दिसला की, ही मोटारसायकल, कार कोण्यातरी दादा, भाऊची असणार, असे पोलीस गृहीत धरतात आणि उगाचच भानगड नको म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या अशा लोकांची हिंमत वाढली आहे. परिवहन कार्यालयातून स्पेशल नंबर मिळविण्यासाठी या लोकांमध्ये स्पर्धा लागली आहे. फॅन्सी नंबर असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येते आणि दंडही वसूल करण्यात येतो. परंतु वाहनचालक दंड भरून पुन्हा फॅन्सी नंबरची दुचाकी, चारचाकी फिरविण्यास मोकळा होतो.

वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी
दादा, मामा, काका, आई, भाऊ यासह इतर स्पेशल नंबर असलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश असतानाही पोलिसांकडून स्पेशल क्रमांक असलेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई केली नाही. रस्त्यांवरून धावणार्‍या गाड्यांना असलेले स्पेशल नंबर नेहमीच दिसून येतात. त्यासाठी सर्रास वाहतूक नियम पायदळी तुडविले जातात.

स्पेशल नंबरचा खेळ
शहरात फॅन्सी नंबरप्लेट असलेली, विशिष्ट क्रमांकावरून नावे तयार केलेली वाहने बेदरकारपणे धावत आहेत. स्पेशल नंबर घेऊन त्याला शब्दांमध्ये बदलून सहजरीत्या वावरताना दिसतात. या गाड्यांवर कोणतीच कारवाई होत नाही, हेच दुर्दैव आहे.